विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भूतान- हें एक स्वतंत्र संस्थान हिमालयाच्या पूर्व भागांत आहे. तें उत्तर अक्षांस २६०४१' ते २८० ७' व पूर्व रेखांश ८८० ५४' ते ९१० ५४' यांमध्यें वसलेलें आहे. याच्या उत्तरेस तिबेट; पूर्वेस तोवांग प्रदेश (हा तिबेटच्या ताब्यांत आहे); दक्षिणेस गोलपाडा, कामरूप, जलपैगुरी हे जिल्हे; पश्चिमेस चुंबीं दरी, सिकीम, व दार्जिलिंग जिल्हा. भूतानच्या उत्तरेस हिमालयपर्वताचीं उंच शिखरें व रांगा आहेत. पूर्वेस व पश्चिमेस या पर्वताचीं शिखरें दृष्टीस पडतात. मुख्य प्रदेशांत टेंकड्यांच्या ओळी दृष्टीस पडतात. व यांमध्यें खोल द-या आहेत. हा मुलुख म्हणजे पर्वतांच्या रांगा, त्यांचे फांटे व त्यांमधील द-या मिळून झालेला आहे.
या भागांतील पर्वतांवर बर्फ फार असल्यामुळें नद्यांस नेहमीं पाणी असतें. व या नद्या अगदीं उंच भागांतून निघाल्यामुळें यांच्या प्रवाहाची लांबीं पण पाण्यास जोर फार असतो. या सर्व नद्या ब्रम्हपुत्रा नदीस मिळतात. पावसाळ्यांत यांस पाणी फार असतें म्हणून पलीकडे जातां येत नाहीं. मुख्य नद्या डिचू (ही भूतान व दार्जिलिंग यांमध्यें आहे), अमोचू अथवा तोसा, चिंचू, माचू, माटिचू, डांगेमेचू या आहेत.
येथील पर्वताच्या भागांत जे खडक आहेत त्यांत अग्निजन्य वालुकामय खडकांचा बराच भाग आहे. ५ हजार फुटांवर अरण्यास सुरवात होते. या अरण्यांत भूर्ज, व ८००० फुटांवर ओक, देवदार व फार हीं झांडें आढळतात. हत्ती, चित्ते, कस्तुरीमृग, अस्वल, गेंडा वगैरे प्राणी आढळतात.
भूतानांतील हवामान प्रदेशाच्या उंचीवर अवलंबून असतें. कांहीं ठिकाणीं तीव्र उष्णता तर इतर ठिकाणीं तीव्र थंडी व कांहीं भागांत अगदीं माफक व अल्हादकारक उष्णता, हे सर्व प्रकार एकाच दिवसाच्या प्रवासांत अनुभवास येतात.
इतिहास- भूतान हा शब्द 'भोतान' (भोता तिबेटा चा शेवट) या संस्कृताभ्दव शब्दापासून बनला आहे. हा मुलूख पूर्वीं भोतिया तेफू नांवाच्या लोकांच्या ताब्यांत होता. हे लोक, कचारी आणि कोख लोक हे एकच असावेत असा तर्क आहे. सुमारें २०० वर्षांपूर्वीं तिबेटी लोकांनीं या लोकांनां जिंकून ते त्यांच्यांत मिळून मिसळून राहिले. या लोकांत दास्यत्व करीत असलेल्या दुस-या जाती आहेत. १७६२ सालीं भूतानी लोकांनीं कुचबिहारावर स्वारी केली तेव्हां तेथील राजानें इंग्रजांची मदत मागितली व हें प्रकरण स. १७७४ त तिबेटच्या मध्यस्तीनें आपसांत मिटलें व उभय देशांनां परस्परांशीं व्यापार करण्याच्या सवलती देण्यांत आल्या. १८२८ सालीं इंग्रजांस असें आढळून आलें कीं, या लोकांनीं दुआरघाट रस्ते आपल्या ताब्यांत घेतले या बद्दल भूतानी लोकांनीं १० हजार रूपये खंडणी देण्याचें कबूल केलें. ती खंडणी वसूल करण्याबद्दल बरींच वर्षें इंग्रज व भूतान यांमध्यें झगडा चालला होता. यांत कित्येक खालसांतील लोक भूतानी लोकांनीं पकडन नेले. या झगड्याचा निकाल १८६५ सालीं झाला. यांत असें ठरलें की बंगाल व आसाम भागांतील सर्व घाटरस्ते इंग्रजांनीं आपल्या ताब्यांत घेऊन त्यामोबदला २५ हजार रूपये वार्षिक खंडणी भुतानी लोकांस द्यावी. आणि ३ वर्षांनंतर ५० हजार रू. वार्षिक द्यावे व भूतानी लोकांनीं पुन्हां शांतताभंग करुं नये. १९१० सालीं ही खंडणी दुप्पट करण्यांत येऊन असा करार झाला कीं संस्थाननें बाह्य संबंधांत ब्रिटिशांचा सल्ला घ्यावा.
भूतानचें क्षेत्रफळ २० हजार चौरस मैल असून लोकसंख्या २५०००० आहे. पुनक ही हिवाळ्यांतील राजधानी भुंगी नदीच्या कांठीं आहे. उन्हाळ्यांतील राजधानी 'ट्राशीशोद्झोंग' ही आहे. पारो, वांगडू, पोटरोंग व टोंगसा हीं गावें आसामांतून ल्हासाकडे जाणा-या रस्त्यावर आहेत. यांखेरीज बांदीपूर, थासा व मुरीखोम हीं मोठीं गांवें आहेत.
अमोचूच्या पश्चिमभागांत नेपाळी लोकांची वस्ती आहे. परकी लोकांस भूतानी लोक चांगल्या त-हेनें वागवीत नाहींत. नेपाळी लोकांची गर्दी होऊं लागल्यास आपल्या लोकांत चांगली जमीन मिळणार नाहीं अशी भूतानी लोकांस भीति वाटते.
भूतानी लोकांचे मुख्य वर्ग तीन आहेतः- (१) पुरोहित वर्ग, (२) अधिकारी वर्ग व (३) शेतकरी वर्ग. भूतानच्या मूळच्या लोकांस भोतिया असें म्हणतात. भोतिया हे काळसर वर्णाचे, मजबूत बांध्याचे, काटक व जोमदार लोक आहेत. ते शूर, रागीट व आळशी आहेत. ते बकरा, याक, डुक्कर वगैरे प्राण्यांचें मांस खातात. चहा आणि जव वगैरे धान्यें त्यांस फार आवडतात.
हे लोक डोक्यावरील केंस नेहमीं आंखूड ठेवतात. त्यांच्या अंगांत गुढघ्यापर्यंत लांब अंगरखा असतो. कसरे भोंवतीं चामड्याचा किंवा सुती पट्टा गुंडाळलेला असतो. पावलापासून गुढघ्यापर्यंत भाग हिंवाळ्यांत नेहमीं झांकलेला असतो. डोक्यावर लोंकरीची टोपी असते. यांचीं घरें आरामशीर असतात. त्यांत फार तर दोन मजले असतात. घर बांधण्याच्या कामीं लोखंडाचा उपयोग करीत नाहींत, भोतिया लोकांस सुतारकाम चांगलें येतें. जमिनीवर तट्या अंथरलेला असतो. घराच्या दोहों बाजूस पडव्या असतात. या लोकांची भाषा तिबेटी भाषेपासून झालेली असल्याकारणानें यांच्या भाषेत निरनिराळ्या ठिकाणीं बराच फरक दृष्टीस पडतो. पश्चिमेच्या मुलुखांत ही भाषा व सिकीमच्या कालिमपोंगची भाषा यांमध्यें बरेंच साम्य दिसतें. ही भाषा बोलतांना ऐकिलें असतां ऐकणारास कोणी रागावून बोलत आहे असा भास होतो. 'भोतिया' अथवा तिबेटा भाषेकरितां ज्ञानकोश वि. १, पृ. २३७-२३८ पहा.
बहुपतित्वाची चाल विशेषतः उत्तरेकडील भागांत दृष्टीस पडते. वडील भावाची बायको ती इतर सर्व भावांचीहि बायको समजण्यांस येते. या चालीला मुख्य कारण दारिद्य्र असें सांगतात. भोतिया पुरूष आळशी व व्यसनासक्त असल्यामुळें बायकांना सर्व कारभार पहावा लागतो; त्यामुळें त्या जास्त स्वतंत्र दिसतात. भोतिया हे शिक्षणांत फार मागासलेले आहेत. त्यामुळें त्यांच्यांत अद्याप अनेक दुष्ट चाली प्रचलित आहेत. हे लोक बौद्धधर्माचे अनुयायी आहेत; पण बुद्धाच्या पूर्वीं प्रचलित असलेला धर्म अजून यांच्यांत चालू आहे. हे भुताखेतांची पूजा करतात. व पशूचे बली देतात. यांचे धर्मग्रंथ तिबेटी लोकांच्या भाषेंत आहेत. व ते यांनां समजत नाहींत. तशीचोझोंग हा भूतानमध्यें अतिशय प्रसिद्ध मठ आहे.
येथील मुलूख डोंगराळ असल्यानें शेती थोड्या ठिकाणीं होतें. येथें तांदूळ, मका, गहूं, हीं पिकें होतात. येथील लोकांच्या गरजा फार थोड्या असल्यानें यांनां लागणारे पदार्थ येथील लोक आपल्या देशांत तयार करीत असत. कंपनी सरकारच्या वेळेपासून भूतानाशीं खुला व्यापार करण्यासाठीं प्रयत्न करण्यांत आले. बंगालमध्यें यासाठीं जत्रा भरवितात. निर्गत माल लांकूड, नारिंगें वगैरे असून आयात विलायती कापड, रेशीम, पानसुपारी खेंचरें, गुरें, कस्तुरी, तूप, चहा मेण वगैरे आहे. एकंदर सर्व रस्ता पहाडांतून आहे. अलीकडे मोठा रस्ता करण्याचें घाटत आहे. त्यासाठीं पाहणी पूर्ण झाली आहे.
राज्यकारभारः-येथील सर्व सत्ता दोघांच्या म्हणजे (१) धर्मगुरू अथवा राजाधर्म व (२) देवराजा अथवा भौतिक व ऐहिक सत्ताधिपति यांच्या हातीं असतो. धर्मगुरू अथवा राजाधर्म हा बुद्धाचा अवतार आहे अशी लोकांत समजूत असे. एका धर्मगुरूचा मृत्यु झाल्यावर दोन वर्षें तशींच जाऊ देतात, कारण धर्मगुरू राजघराण्यांत जन्म घेतो व त्याच्या जन्मानंतर आठव्या दिवशीं पाऊस पडतो. आणि ज्या घरांत तो जन्म घेतो त्या घरावर इंद्रधनुष्य पडतें अशी या लोकांत समजूत आहे.
१९०७ मध्यें देवराज व धर्मराज ही एकच व्यक्ति होती. या देवराजानें अधिकारसंन्यास केल्यामुळें १९०७ पासून सर यूग्येन याला पहिला वंशपरंपरेचा भूतानचा महाराजा म्हणून निवडण्यांत आलें.
भूतानचे पूर्वभूतान व पश्चिमभूतान असे दोन भाग आहेत. या भागांतील सरदार लोकांनीं ऐहिक सत्ताधिका-याची निवड करून नेमणूक करावी अशी चाल आहे. वस्तुस्थिती अशी आहे कीं, ज्या भागांतील सरदार लोकांचें वजन जास्त त्यांचा मुख्य देव बहुतेक राजा होतो. राज्यकारभाराच्या सोयीसाठीं दोन मंडळें असतात. पहिल्या मंडळाचे सभासद धर्मराज, देवराज व दुसरे सरदार असतात. जेव्हां कांहीं राष्ट्रीय प्रश्न उद्भवतात त्यावेळीं हें मंडळ भरतें. दुसरें एक मंडळ असून त्याच्याकडे यांपेक्षा कमी महत्वाच्या बाबीं सोंपवितात. वजाच्या हाताखालीं दुसरे बरेच अधिकारी आहेत. त्यांपैकीं मुख्य म्हटले म्हणजे खाजगी कारभारी सेनापति हे होत. वसूल जमा करण्यासाठीं व किरकोळ तंटे तोडण्यासाठीं ठेकेगार व काझी नेमिले आहेत. मोठ्या गुन्ह्याची चौकशी परो येथें होते. अधिकारीवर्गावर सरकारचा ताबा नाहीं यामुळें राज्यकारभारांत बराच घोंटाळा माजलेला असतो. इंग्रज सरकारचा पत्रव्यवहार व इतर राजकीय गोष्टींचा खल सिकीमच्या पोलिटिकल एजंटामार्फत चालतो. भूतानच्या पश्चिमभागचे लोक कर म्हणून कांहीं धान्य व लोणी देतात. नेपाळी लोक घरपट्टी, चराईपट्टी वगैरे कर देतात. संस्थानांत ९५०० लढवय्ये लोक आहेत. येथील प्रजा बहुतेक अक्षरशत्रु आहे.