विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुवनेश्वर- बहार, पुरी जिल्हा, खुर्दा पोटविभागांतील एक गांव. हें फार प्राचीन आहे. यास आम्रतीर्थ असेंहि नांव आहे. भुवनेश्वर हें या प्रांतांतील शैव मताचें आद्यपीठ होतें. काशीच्या तोडीचें हें शहर करण्याचा येथील राजांचा बेत होता. ५ ते १२ शतकेपर्यंत येथें केसरी घराण्यांतील राजे (४७४) राज्य करीत होते. त्यांनीं बौद्धधर्मी यवनांनां म्हणजे ग्रीक राजांनां जिंकून बौद्धधर्माचें उच्चाटन करून शैवधर्माचा प्रसार केला. येथें भुवनेश्वर नांवाचा तलाव आहे. त्याभोंवतालीं २०० देवळें आहेत. लिंगराज, मुक्तेश्वर, अनंतवासुदेव हीं देवळें पाहण्यासारखीं आहेत. पापनाशी, बिंदुसागर, सहस्त्रलिंगम, हीं देवळें आहेत. मुख्य भुवनेश्वर महादेवाचें देऊळ फार उंच (तीन कोंसांवरून दिसणारें) होतें. त्या भोंवती ७ हजार मूर्ती त्यावेळीं होत्या. हल्लीं ५००/६०० मूर्ती आहेत. त्यांवरून ओढ्यादेशांतील शिल्पकलेची कल्पना होते. भुवनेश्वराचें मंदिर स. ५०० पासून ६५७ पर्यंत या कालांत झालें. (चित्र, वि. ९, औ ९ पहा) (इंटर-ओरिसा; वैद्य-मध्य.भा.भा. १)