विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिवानी- पंजाबांतील हिसार जिल्ह्यांत ही एक तहशील आहे. क्षेत्रफळ ७५२ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) १२६०१५. हिच्यांत १३० खेडीं आहेत; यांपैकीं तोशम ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचें आहे. मुख्य ठिकाण भिवानी हें राजपुताना-माळवा रेल्वेच्या फांट्यावर आहे. गांवची लोकसंख्या सुमारें तीस हजार. हें व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. इंग्रजांच्या आमदानींत हें भरभराटीस आलें. व्यापाराचे जिन्नस गहूं, मीठ, साखर, सूती कापड, लोखंड वगैरे. येथें पितळेचीं भांडीं तयार होतात. येथें कांहीं कापूस पिंजण्याच्या गिरण्या आहेत.