विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भास- एक संस्कृत नाटककार. या कवीचा व त्याच्या स्वप्नवासवदत्त नामक नाटकाचा उल्लेख इतर संस्कृत ग्रंथांत आढळत असे, परंतु सुमारें १०।१५ वर्षांपूर्वींपर्यंत या कवीची यापेक्षां अधिक माहिती नव्हती. पण त्रावणकोर संस्थानच्या महाराजांच्या आश्रयानें चाललेल्या त्रिवेंद्रम् संस्कृत ग्रंथावलीच्या ग्रंथसंग्रहप्रसिद्धीच्या कामावर असलेले पंडित गणपतिशास्त्री यानां पद्यनामपुराजवळ असलेल्या मनलिक्कर मठांत कांहीं नाटकें सापडलीं व हीं नाटकें भासाचीं आहेत असें गणपितशास्त्रयांनीं बरींच प्रमाणें देऊन सिद्ध केल्यामुळें भासाच्या नांवानेंच जें इतकें दिवस समाधान मानून घ्यावें लागत असे त्याऐवजीं त्याच्या कृती वाचण्याची संधि उपलब्ध झाली आहे. हीं नाटकें प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक विद्वानांनीं आपलीं मतें प्रसिद्ध केलीं आहेत. त्यांपैकीं कांहींनीं हीं नाटकें प्राचीन महाकवि भासाचीं नव्हेतच असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. हीं नाटकें दुस-या कोणातरी कवीचीं असावींत असें वरील विद्वानाचें म्हणणें आहे. कांहींच्या मतें अंतर्गत पुराव्यावरून स्वप्नसावासवदत्त व फार तर यौगंधरायण हींच नाटकें भासकृत असावीं. बाकीचीं नाटकें भासाचींच असें म्हणण्यास पुरेसा पुरावा नाहीं. त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट एवढीच कीं, भासाचीं म्हणून जीं नाटकें गणपति शास्त्र्यांनीं प्रसिद्ध केलीं आहेत तीं कोणच्या कां असेना पण एका प्राचीन कवीचीं असली पाहिजेत याबद्दल दुमत नाहीं. अद्यापि हा वाद चालू असल्यामुळें यासंबंधीं निश्चित मत देतां येत नाहीं. तथापि पूर्वींच्या कवीच्या नाटकांत अगर काव्यांत भासाच्या स्वप्नवासवदत्तासंबंधीं जे उल्लेख येतात ते स्वप्नवासवदत्त व गणपतिशास्त्र्यानां सांपडलेलें स्वप्नवासवदत्त हीं दोन्हीं एकच मानल्यास या नाटकाचा कर्ता भासच होय असें म्हणतां येतें व स्वप्नवासवदत्ताबरोबरच या नूतनसंशोधित इतर नाटकांचें ग्रंथकर्तृत्वहि भासाकडेच येण्याचा संभव आहे.
भासाच्या नांवावर जीं नाटकें गणपतिशास्त्री यानीं प्रसिद्ध केलीं आहेत. तीं म्हणजे स्वप्नवासवदत्त, प्रतिज्ञायौगंधरायण, पंचरात्र, चारूदत्त, दूतघटोत्कच, अविमारक, बालचरित, मध्यमव्यायोग. कर्णभार, ऊरूभंग हीं होत. भास हा कलिदासापूर्वीं एक दोन शतकें झाला असावा असें अनेक पुराव्यांवरून सिद्ध करतां येतें. भासाच्या नाटकांचें अवलोकन केल्यास तो चांगल्या प्रकारचा नाटककार होता असें सहज दिसून येतें त्याच्या संविधानकांत जागजागीं रचनाचातुर्य आढळतें. त्याच्या नाटकांतील भाषा सोपी पण मनोहर आहे. पात्रांच्या स्वभावपरिपोषहि चांगल्या त-हेनें सांधलेला दिसतो. याच्या नाटकांत सुभाषितांचें वैपुल्य आढळून येतें. क्वचित् स्थलीं अपाणिनीय शब्दप्रयोग आढळतात. तथापि तेवढ्यावरून त्याची उत्कृष्ट नाटककार या नात्यानें जी ख्याति आहे तिला बाध येत नाहीं. याच्या चारूदत्त नाटकावरूनच शुद्रकानें आपलें मृछकटिक नाटक रचलें असावें असें दिसतें. याच्या नाटकांचीं मराठींत भाषांतरें करण्याचा प्रयत्न चालूं आहे. (भासावर अनेक यूरोपीय लेखकांनीं लेख लिहिले आहेत. डॉ.मुखटणकर यानीं निरनिराळ्या नियतकालिकांत या संबंधीं सर्व वाङमय देऊन ७ लेख लिहिले आहेत)