विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाविणी व देवळी- लोकसंख्या (१९२१) ६२५४. हे लोक रत्नागिरी व कानडा जिल्ह्यांत आणि सावंतवाडी व गोवें संस्थानांत आढळतात. सावंतवाडी व मालवण येथील सरदारांपासून दासींनां झालेल्या संततीचे हे वंशज आहेत असें सांगतात. या लोकांत पुरूषांनां देवळी अथवा नाईक व बायकांनां भाविण किंवा नायकीण अशीं नांवें आहेत. मराठा व भंडारी या दोन जातींपासून झालेल्या लोकांचा भरणा यांमध्यें फार आहे. देवळांतील दिव्याचें तेल डोक्यावर ओतून शुद्र जातींतील बायकांनां या जातींत घेतलें जातें. भाविणी बायका जेजुरी येथील मुरळ्यांप्रमाणें देवाला वाहिलेल्या असतात व त्यामुळें त्या इतर वेश्यांहून भिन्न आहेत. त्यांचा सामाजिक दर्जा मुरळ्यांप्रमाणें असून कळवंतिणींपेक्षां खालीं असतो व भर समाजांत नाचण्याची व गाण्याची त्यांनां मनाई असते. भाविण मुली वयांत आल्यावर आपल्याला देवाला वाहून घेतात. ज्या विधीनें त्यांचे देवाशीं लग्न लागतें त्याला शेषाविधी असें म्हणतात. वराची प्रतिमा म्हणून देवांच्या घुंगराबरोबर लग्न लावण्यांत येतें. ज्या मुलींची नाईक अथवा देवळी यांबरोबर लग्न करण्याची इच्छा असेंल त्यांनां हा विधि करावा लागत नाहीं. या लोकांचे संस्कार, खाण्यापिण्याचे रीतिरिवाज व धर्मं हे मराठे लोकांप्रमाणेंच आहेत. मराठ्यांच्या हातचें हे खातात पंरतु सोनार, सुतार व इतर हीन जातींच्या हातचें खात नाहींत. कित्येक मराठे सुद्धां यांच्या हातचें खातात (से. रि. (मुंबई) १९११)