विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भालेराई- संभाजीच्या वधानंतर माहराष्ट्रांत मुसुलमानांचीं ठाणीं बसलीं. तेव्हां प्रथम राजाराम व त्याचे प्रधान हे चंदी (जिंजी) च्या किल्ल्यांत राहिले, व तेथून त्यांनीं आपलीं कारस्थानें लढविलीं. इतकें सर्व घडेपर्यंत मध्यंतरीं महाराष्ट्रांत जी धामधूम झालीं तींत रामचंद्रपंत अमात्याच्या हुकमतीखालीं मराठे लोकांच्या पुष्कळ स्वतंत्र टोळ्या बनल्या व त्यांनीं मुसुलमांनाचीं ठाणीं उठविण्याचा निरनिराळ्या स्वतंत्र यत्न केला. या धामधुमीमुळें रयत मात्र हैराण होई. ह्या धामधुमीस 'भालेराई' म्हणण्याचें कारण असें कीं, त्यावेळीं रूपाजी व बाबाजी भालेराव ह्या नांवाचे दोन सरदार होते; ते ह्या धामधुमीचे उत्पादक व पुढारी होते. ह्यांचें उपनावं भोंसले असें होतें. परंतु हे भाला मारण्याच्या कामीं मोठें पटाईल असल्यामुळें ह्यांनां भालेराव असें टोपणनांव मिळालें होतें. ह्यांनीं महाराष्ट्रांत कोठेंहि मुसुलमानांचीं कायमचीं ठाणीं बसूं दिलीं नाहींत. ह्या वेळेपासून 'भालेराई' हा शब्द ‘अंदाधुंदी’ ह्या अर्थीं वापरतात (भारतवर्ष पु .२ रें अंक ५ वा)