विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भारवि- किरातर्जुनीयम् या प्रसिद्ध महाकाव्याच्या कर्ता. याच्यासंबंधींची माहिाती मुळींच उपलब्ध नाहीं. किरातर्जुनी यम् या त्याच्या काव्यावरूनहि त्याच्यासंबंधींहि नक्की माहिती मिळूं शकत नाहीं. त्याच्या काव्यांत डोंगरकांठच्या देखाव्याचीं जीं जागजागीं वर्णनें आढळतात. त्यावरून तो डोंगराळ प्रदेशामध्यें रहात असावा असें कांहीं जणांनीं प्रतिपादन केलें आहे. तसेंच शंकराच्या वक्षस्थळावर अर्जुनानें केलेल्या प्रहाराला सह्याद्रीपर्वताच्या पायथ्यावर आदळणा-या समुद्राच्या लाटांची उपमा त्यानें दिलेली आहे त्यावरून हा तो सह्याद्रीपर्वताच्या आसपासच्या भागांत राहणारा असावा असाहि कांहींनीं तर्क लढाविला आहे. हा चवथ्याय अगर पांचव्या शतकांत होऊन गेला असावा असें अनेक पुराव्यांवरून मानण्याला जागा आहे. किरातर्जुनीयम् हा एकच ग्रंथ त्याच्या नांवावर मोडतो. पण या एका ग्रंथावरूनच तो महाकवि होता असें म्हणण्यास हरकत नाहीं. भारवीच्या कवितेंत अर्थगौरव विशेष दिसून येतो असें जे उपमा कालिदासस्य भागवेरर्थगौरवम्’ या चरणांत म्हटलें आहे तें अगदीं यर्थाथ आहे त्याच्या काव्यांत वीररस उत्तम रीतीनें रंगविलेला आढळतो. याशिवाय निरनिराळ्या वेळच्या लढायांचीं तेजस्वी वर्णनें, राजनितिविषयक प्रश्नांची चर्चा, स्वाभिमानाबद्दलचे उल्लेख इत्यादी गोष्टींवरून तो ज्या वेळीं वीर्य शौर्य इत्यादि गुणांचें हिंदुस्थानांत प्राबल्य होतें अशा काळांत उदयास आला असावा असें वाटतें, व त्याचप्रमाणें तो कोणत्या तरी राजाच्या दरबारीं चमकला असावा असें दिसतें. त्याच्या कवितेंत ओज दिसून येतें. त्याच्या काव्यांतील भाषा ही मुख्यतः गौडरीतीची असली तरी तींत वैदर्भीरीतीचेंही मिश्रण पुष्कळ ठिकाणीं आढळून येतें. त्याच्या काव्यांत जागजागीं सुंदर उक्ती आढळून येतात.