विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भादौरा– मध्यहिंदुस्थानच्या एजन्सींत हे एक लहानसें संस्थान असून तें ग्वाल्हेर येथील रेसिडेंटच्या देखरेखीखालीं आहे. क्षेत्रफळ सरासरी ५० चौरस मैल व लोकसंख्या सुमारें तीन हजार आहे. इ .स. १८२० च्या सुमारास दौलतराव शिंद्यानें या घराण्यांतील मानसिंग नांवाच्या पुरूषाला ५ खेडीं दिलीं तेव्हांपासून हें संस्थान बनलें. येथील संस्थानिकांनां राजा ही पदवी असून हे उदेपूरच्या राजघराण्यापैकींच सिमोदिया रजपूत आहेत. संस्थानचें उत्पन्न ५ हजार रूपये आहे.