विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भांदक- मध्यप्रांत जिल्हा चांदा, वरोरा तहशील. चांद्याच्या रस्त्यावर वरोरापासून १२ मैलांवर हें एक खेडें आहे. याची लोकसंख्या १९०१ मध्यें ३१८८ होती. प्राचीन काळीं हें फार मोठें शहर होतें. असें म्हणतात. महाभारतांत भद्रावती नगरविषयीं जें वर्णन आलेलें आहे तें भद्रावती नगर हेंच होय असें म्हणतात. येथें प्राचीन अवशेष बरेच आहेत. देवळाजवळ दोन शिलालेख कांहीं चमत्कारिक लिपींत खोदलेले आढळले असून त्यांचा अर्थ अजूनक कोणी लावलेला नाहीं गांवाच्या नैॠत्येस सुमारें दीड मैलावर विजासन डोंगरांत एक बौद्ध लेणें आहे. त्यांत एक अतिशय मोठी अशी बुद्धाची मूर्ति चबुत-यावर बसलेली खोदलेली आहे. ही मूर्ति पांडु राजाची आहे. अशी येथें स्थानिक दंतकथा आहे. येथें एक नवव्या शतकांतील शिलालेख होता तो नागपूर म्युझियममध्यें ठेवण्यांत आला आहे. गांवाच्या पूर्वेस रस्त्याजवळच एक तलाव असून त्यांत एक बेट आहे. तेथें जाण्याकरितां एक जुना पूल असून त्याची लांबी १३६ फूट व रुंदी ७ फूट २ इंच आहे.