विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भांडारकर, रामकृष्ण गोपाळ (१८३७-१९२५)- महाराष्ट्रांतील सुप्रसिद्ध संशोधक समाजसुधारक व संस्कृत पंडित. यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यांत मालवण मुक्कामीं झाला. प्राथमिक शिक्षण मालवण व राजापूर येथील शाळेंत झाल्यानंतर रत्नागिरीस रामकृष्णपंत इंग्लिश शाळेंत जाऊं लागले. १८५९ -६२ सालापर्यंत त्यानीं मॅट्रिक एफ, ए. व बी. ए च्या परीक्षा पास झाले. पुढें सिंध-हैद्राबाद व रत्नागिरी येथील शाळेंत हेडमास्तर या नात्यानें काम केल्यानंतर १८६८ सालीं एलफिस्टन कॉलेजांत त्यानां संस्कृतीचे असिस्टंट प्रोफेसर नेमण्यांत आलें. हा वेळपर्यंत त्यांची संशोधनाकडे प्रवृत्ती नव्हती. तथापि एका आकस्मिक कारणानें त्यांचा संशोधनक्षेत्रांत प्रवेश झाला.
यांनतर शिलालेख नाणीं यांचा अभ्यास करून प्राचीन इतिहासासंबंधीं लेख लिलिण्यास त्यानीं सुरवात केली लंडन येथें १८७४ सालीं भरलेल्या सार्वदेशीय प्राच्य विद्यापंडीतांच्या परिषदेपुढें वाचण्याकरितां त्यानीं नाशिकच्या कोरीव लेण्यांवरील निबंध पाठविला व त्याची वहावा झाली. त्यामुळें त्यांची किर्ति वाढली. १८७९ सालीं त्यानां सरकारनें प्राचीन इतिहाससंशोधक नेमलें. याच्यापूर्वी, त्यानां विल्सन फॉयलालॉजिक लेक्सर्स देण्याचा बहुमान मिळाला होता. १८७९ सालीं त्यानां डेक्कन कॉलेजमधील प्रोफेसराची जागा मिळाली. या जागेवर त्यानीं २१ वर्षें काम करून पेन्शन घेतलें. १८८६ सालीं व्हिएन्ना येथील प्राच्यविद्यापरिषदेला ते हजर राहिले. सिंडिकेटचे सभासद युनिव्हर्सिटीचे परीक्षक, युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सेलर या नात्यानें मुंबई विश्वविद्यालयाशीं त्यांचा निकटचा संबध होता. त्यांच्या विद्वत्तेमुळें गाटिंजेन युनिव्हसिटी एडिंबरो युनिव्हर्सिटी यानीं पीएच. डी, एल्एल्. डी. या पदव्या यानां दिल्या. तसेंच इंग्लंड, जर्मनी, अमेरिका व इटली इत्यादि देशांतील पौरस्त्य विद्याविषयक संस्थांनीं त्यानां आपल्या संस्थांचे सन्मान्य सभासद करून त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला. ब्रिटिश सरकारनें त्यानां सी, आय, ई व के. सी आय ई या सन्मानदर्शक पदव्या दिल्या. त्यांच्या वयाला ८० वर्षें पुरीं झालीं त्यावेळीं त्यांच्या शिष्यांनीं भांडारकर स्मारक लेखसंग्रह प्रसिद्ध केला .त्यांच्या संशोधनाचें द्दश्यफल म्हणजे त्यांच्या नांवानें पुण्यास स्थापन झालेली 'भांडारकर रीसर्च इन्सिटट्यूट’ हें होय. पेन्शन घेतल्यानंतर त्यानीं आपला सर्वकाळ पुणें येथें मुळामुठा येथील संगमाच्या पलीकडे बांधलेल्या संगमाश्रमांत घालविला.
भां डा र क रां चें सं शो धन व ग्रं थ ले ख न.- डॉ. भांडारकर यानीं अनेक बाबतींत संशोधन करूंन निरनिराळ्या मासिकांत विद्वताप्रचुर लेख लिहिले आहेत. याशिवाय मालतीमाधव इत्यादि संस्कृत पुस्तकांवर त्यानीं टीका लिहिलीं आहेत. पण 'अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन' व 'वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर सेक्ट्स’ हे त्यांचे प्रमुख ग्रंथ होत. या पुस्तकांच्यामुळें त्यांची संशोधनकार्यांतील योग्यता निःसंशय रीतीनें व्यक्त होते.
वाङमयाप्रमाणेंच सामाजिक सुधारणेच्या कार्यांतहि ते अत्यंत कळकळ दाखवीत असत. प्रार्थनासमाजाचे ते कांहीं काळपर्यंत आधारस्तंभ होते असें म्हटलें तरी चालेल आहरविाहारांतला नियमितपणा, शिस्त निव्यर्सनी व साधी राहणे इत्यादि गुण त्यांच्या अंगात होते म्हणूनच ते इतके वर्षेंपर्यंत जगूं शकले. १९२५ सालच्या आगस्ट महिन्याच्या २४ व्या तारखेस पुण्यास त्यांचें देहावसान झालें.