विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भागलपूर– जि ल्हा – बिहार – ओरिसा, भागलपूर भागांतील एक जिल्हा. भागलपूर हा ''भलीपूर'' याचा अपभ्रश असून ' भगली' याचा अर्थ चांगलें नशीब अथवा पळून आलेले लोक असा होतो याचें क्षेत्रफळ ४२२६ चौरस मैल आहे. उत्तरेस नेपाळ ; पूर्वेस पूर्णिया जिल्हा (हा गंगेच्या उत्तरेस आहे.) दक्षिण व पूर्वेस (गंगा नदीच्या दक्षिणेस) संताळ परगणे; पश्चिमेस दरभंगा व मोंगीर जिल्हे गंगेच्या प्रवाहामुळें या जिल्ह्याचे दोन सारखे भाग झाले आहेत. या जिल्ह्यांतून गंगेस उत्तरेकडून हिमालयांतून निघालेल्या पुष्कळ लहान नद्या मिळतात. त्याचप्रमाणें दक्षिणेकडुनहि ब-याच नद्या मिळतात. या जिल्ह्यांतील सर्व नद्यांमध्यें कोसी व गंगा या मोठ्या आहेत व त्यांचे प्रवाह वेळोवेळीं बदलत गेले आहेत.
जमीन एकंदरींत सुपीक आहे. आंबा व ताड यांच्या बागा मोठ्या आहेत. मोह व काटेसावरी यांची मोठमोठीं झाडें सर्व ठिकाणीं आढळतात. जिल्ह्यांत जंगल नाहीं. फक्त कांहीं कांहीं ठिकाणीं पळसाडीचे पट्टे आढळतात. त्यांत तुरळक तुरळक मोठीं झाडें दिसतात; त्यांपैकीं साल व तेंडु हीं मुख्य होत. दक्षिण भागीं अस्वलें आहेत. कोसीच्या गवताळ रानांत वाघ क्वचित ठिकाणीं आढळतात. यांशिवाय रानमांजरें, डुकरें व चित्ते हीं जनावरें आहेत. हवा निरोगी आहे. पाऊस सरासरी ५१ इंच पडतो.
इतिहास:– मुसुलमानांच्या वेळेपासून या जिल्ह्यास ऐतिहासिक दृष्ट्या थोडेंबहुत महत्त्व प्राप्त झालें. ऐने इ अकबरींत भागलपूर गांवाचा उल्लेख केलेला आहे व त्यावेळीं या महालाचें उत्पन्न ११७४०३ रूपये होतें. मानसिंगानें बिहारी फौजेचें भागलपूर येथें लष्करी ठाणें केलें होतें. पुढें येथें लष्करी सुभा राहात असे. ईस्ट इंडिया कंपनीस जेव्हां मोंगल बादशहापासून बंगालचे दिवाणी हक्क मिळाले तेव्हां भागलपूर जिल्हा मोगींर सरकारांत मोडत असे. डोंगराळ मुलुखांतील रानटी लोकांनीं दक्षिण भागीं बंडाळी माजविल्यामुळें या जिल्ह्याची दक्षिण सरहद्द नक्की ठरली नव्हती १७६९ सालपर्यंत फौजदारी व मुलकी कारभार बादशहाच्या कामगांराकडे सोंपविलेला होता. त्यामुळें त्या बाबतींत बरीच अंधाधुंदी माजली होती. १७७२ सालीं कपंनीसरकानें मुलकी कारभार आपल्या हातीं घेऊन वसुलाच्या बाबतींतला घोटाळा नाहींसा केला.
पुराणवस्तु:– पुराणवस्तूंचे अवशेष मंदागिरी येथें आढळतात. जहांगिरी व पथरघाट येथें खडकांवर कोरीव कामाचे नमुने आढळतात. कोलोंगे येथें एक खडकांतील कोरीव देऊळ आहे. त्याचप्रमाणें सुलतानगंज या गांवीं बौद्ध मठांचे अवशेष दिसतात. लोकसंख्या (१९२१) २०३३७७० अहीर, गोला, घानूक, मुसहर, चांभार, कौइरी, तांजी दोसाघ वगैरे मुख्य जाती हिंदूंत आहेत. शे. ६८.६ लोक शेतीवर उपजीविका करतात. येथील लोकांचें मुख्य अन्न तांदूळ होय. धान, मका, गहूं, जव जोंधळा व हरभरा हीं मुख्य पिकें आहेत.
खनिज द्रव्यें – गौरीपूर, दहीजार, खांडा, गमहरिया, वगैरे ठिकाणीं शिसें अशुद्ध स्थितींत सांपडतें. ज्या पदार्थांत शिसें आढळतें, त्यांत रूप्याचें प्रमाणहि थोडें असतें. रूपें काढण्याचे दोनदां प्रयत्न केले, पण तें काम पुढें न चालवितां तसेंच सोडून दिलें गेलें. याखेरीज तांबें, अभ्रक, क्लोराइट, याशेफ (जास्फर = राहूचा खडा) व लोखंड हीं सांपडतात.
व्यापार व दळवणवळण:– टसर रेशमाचें कापड, नीळ, तूप, लोंखड व पितळेचीं भांडीं, कांचेच्या व लाखेच्या बांगड्या वगैरे जिन्नस येथें तयार होतात. आयात मालांत दगडी कोळसा, मीठ, कापड, गोणपाट, हरभरा, द्विदल धान्यें, कच्चें रेशीम व तंबाखू व निर्गत तांदूळ, धान, गहूं, हरभरा कडधान्यें जवस, मोहरी व नीळ हा आहे. या जिल्ह्याचा व्यापार मुख्यत्वेंकरून नेपाळ व पूर्वबंगाल यांशीं चालतो. रेल्वेरस्ते बरेच आहेत. साक्षरतेचें प्रमाण सुमारें शे. ४ आहे.
पोट विभाग- क्षेत्रफळ ९३४ चौरस मैल लोकसंख्या (१९११) ६९८३७७. जमीन फार सुपीक आहे. मुख्य गांवें भागलपूर, कोलगोंग, व सुलतानगंज.
गा वं– हें या जिल्ह्याचें व भागाचें मुख्य ठिकाण गंगेच्या उजव्या तीरावर आहे. हें ईस्ट इंडिया रेल्वेचें स्टेशन असून कलकत्त्यापासून आगगाडीनें २६५ मैल दूर आहे. लोकसंख्या (१९२१/६८८७८ व्यापारामुळें या गांवाची सारखी भरभराट होत आहे. येथें दोन कॉलेजें (पैकीं एक शेतकी) व बरींच हायस्कुलें आहेत. १८६४ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली.