विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भविष्यपुराण- या पुराणाच्या नांवावरून असा अर्थ होतो कीं, यांत पुढील काळाबद्दल भविष्य वर्णन केलेलें आहे. तथापि, आपस्तंव धर्मसूत्रांत ज्यांतील उतारे दिले आहेत. तो प्राचीन ग्रंथ, आणि आपणांस आज 'भविष्यपुराण' नांवाच्या ग्रंथाची जी प्रत उपलब्ध आहे ती या दोन्ही नि: संशय एक नाहींत. यांतील सृष्ट्युत्पत्तीचें वर्णन मनुस्मृतींतून घेतलेलें आहे, आणि याशिवायहि ब-याच ठिकाणीं मनुस्मृतीचा उपयोग केलेला आहे यांतील बहुतेक भागांत धार्मिक संस्कार, ब्रह्मणभोजन, जातिधर्म, वगैरे गोष्टीचें वर्णन आहे. फक्त थोड्या दंतकथा आहेत. नागपंचमीच्या सणाचें वर्णन आल्यामुळें नागदेवतांची नामावली व कांहीं नागसंबंधीं कथा दिल्या आहेत. शिवाय एका ठिकाणीं एका ठिकाणीं शाकद्वीपां (सिथियनांचा देश) तील सूर्यापासनेचें वर्णन फार महत्त्वाचें आहे. भोजक व मग नावाच्या सूर्यपूजकाची हकीकत आहे. याचा झोरोआस्ट्रियन म्हणजे पारशी धर्मांतील सूर्य व अग्रिपूजेशीं खास संबंध आहे. या पुराणांत नवीन नवीन भर घातलेली दिसते. कारण मोंगल बादशहा, इतकेंच नव्हे तर अलीकडे होऊन गेलेली व्हिक्टोरिया (विकटावती) महाराणीसुद्धां या पुराणांत उल्लेखिलेली आढळतें. तेव्हां या पुराणाच्या मूळ विश्वसनीय प्रतीबद्दलचा संशय दृढ होतो.
या पुराणाचा आणखी भाग म्हणून एक भविष्योत्तर पुराण आहे. त्यामध्यें कांहीं दंतकथा व प्राचीन गोष्टी आहेत; पंरतु धार्मिक आचारांच्या वर्णनपरच विशेषत: तो ग्रंथ आहे. भविष्यपुराणांती-विशेष: भविष्योत्तरपुराणांतील अध्याय म्हणून अलीकडील महात्म्यें व दुसरीं पुष्कळ पुस्तकें मोडतात.