विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भवया– ही एक मध्यहिंदुस्थान व गुजराथ –काठेवाडांत राहणारी, १६ हजार लोकांची जात आहे. हे लोक पौराणिक नाटकें व लळितें करतात. अहमदाबादच्या उत्तरेकडील उंजगांवच्या असित नांवाच्या ब्राह्मणापासून अगर सोनारापासून याचीं उत्पत्ति झालेली आहे असें म्हणतात. या असितनें एका कुणबी मुलीबरोबर व्यवहार ठेविल्यानें, त्याला त्याच्या जातीनें वाळींत टाकिलें पण त्याला गाणेंबजावणें येत असल्यानें, त्यानें त्यावरच आपला चरितार्थ चालविला. अर्थात त्याच्या या भवया वंशजानींहि तोच धंदा उचलून त्यांत नाटकें, लळितें याची भर घातली, अशी यांची उत्पत्तिकया आहे. यांच्यांत तर्गाळ व व्यास अशा दोन शाखा असून, त्यांत खाणेंपिणें व लग्रव्यवहार होत नाहींत. व्यास लोक कुणब्याच्या हातचें खातात, पण त्याहून खालच्या लोकांबरोबर ते जेवीत नाहींत, पण तर्गाळ हे कोळ्यांबरोबरहि जेवतात. भवया पुरूष देखणे असून, नाटकातून ते स्त्रियांचीहि भूमिका घेतात. हे उत्तम दर्जाचे नट असतात. गुजराथेंत श्रीमंत कोळी व कुणबी लोक भवयांची एक नाटकमंडळी आपल्या गांवीं आपल्या खर्चानें ठेवतात. पूर्वीं यांचीं नाटकें खेडेगांवांतून फार प्रिय होतीं, परंतु हल्लीं सुधारलेल्या नाटकमंडळ्या निघाल्यानें यांचा धंदा बसत चालला आहे हे लोक शाक्त व शैवपंथी आहेत; परंतु मद्यमांसास शिवत नाहींत. यांचे उपाध्याय औदीच ब्रह्मण असतात. यांच्यांत मुंजीची चाल आहे, पण जानव्याची ते विशेष दरकानर बाळगीत नाहींत. यांचे बरेचसे विधी तिकडील कुणब्यांप्रमाणें आहेत.
(मुं.गॅ.पु.९ भा. १.)