विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरहुत- बागेलखंडामधील एक खेडें. अलाहाबादच्या नैॠत्येस ९५ मैलांवर हें खेडें वसलेलें आहे. या खेड्याची प्रसिद्धि मुख्यतः तेथें असलेल्या स्तूपाबद्दल आहे. हा स्तूप अशोककालीन असावा असें कनिंगहॅमचें म्हणणें आहे. हा स्तूप वर्तुळाकृति असून त्याभोंवतीं चारी बाजूला नक्षीदार कठडे असून कठड्याच्या चारी बाजूला चार दरवाजे आहेत. प्रत्येक बाजूस सोळा खांब आहेत तसेंच प्रत्येक बाजूला सुशोभित तोरण आहे. या खांबांच्या पदकाकार भागांवर कमलें, फुलें इत्यादि सुंदर चित्रें व बौद्ध वाङ्मयांतील निरनिराळे प्रसंग कोरलेले दिसतात. श्रावस्ती येथील जैतवन अनाथपिडिकानें विकत घेतलें त्या प्रसंगास अनुलक्षून असलेलें चित्र फार प्रेक्षणीय आहे. या स्तूपावर जी निरनिराळीं चित्रें कोरलीं आहेत त्यांवरून तत्कालीन समाजाच्या पोषकाची कल्पना, व इतर सामाजिक चालीरीतींची कल्पना होते. भरहुत येथील स्तूपासंबंधीं लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तेथील चित्रांमध्यें नग्न स्त्रियांचीं चित्रें काढलेलीं आढळत नाहींत. या स्तूपाच्या भोंवतालच्या कठड्याचा एक दरवाजा, व मोडकें तोरण हीं कलकत्त्याच्या अजबखान्यांत ठेवण्यांत आलीं आहेत.