विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भरवाड- यांची मुख्य वस्ती मुंबई इलाख्यांत आहे. लोकसंख्या (१९११) ३८५२८.हे लोक गुजराथेंत आहेत व ते मेहेर जातीचे आहेत असें म्हणतात. हे आपण कृष्णाचा धर्मपिता जो नंद मेर त्याचे वंशज आहोंत असें सांगतात. कांहींचें असें मत आहे कीं, वैश्य पुरूष व शुद्र स्त्री यांचे हे वंशज असावेत. हे मूळचे गोकुळवृंदावनकडील असावेत असें वाटतें. हे बहुधां धनगर किंवा गुराखी आहेत, त्यामुळें धनगरांचा समावेश यांच्यांतच करतात; कांहीं शेतकरी व मजूरहि आहेत. ते गाई, म्हशी ठेवून बहुतकरून दूध तूप विकून आपली उपजिविका करतात. त्यांच्या बायकांवर लोण्याचा मोठा उद्दीपक परिणाम होतो असें म्हणतात, कारण लोणी खाल्लें असतां त्यांनां मद चढून, बीभत्स गाणीं गाणें, मोडतोड करणें, पिकाची नासाडी करणें इत्यादि गोष्टी त्यांच्या हातून घडतात. काडवा कुणब्यांप्रमाणेंच भारवाड लोकांचीं लग्नें १२, १५ किंवा २५ वर्षांतून एकदां वैशाख मासांत होतात व त्या दिवशीं आसपासचीं लग्नें एकाच ठिकाणीं होतात. विधवेशीं लग्न करण्याचा पहिला हक्क दिराला असतो. उत्तर गुजराथखेरीज सर्व प्रांतभर काडीमोड करण्याची चाल आहे. भरवाड लोकांचें अन्न म्हणजे दूध व मक्याची भाकरी हें आहे.
सामाजिक तंट्यांच्या निकालाकरितां काठेवाडमधील भरवाड लोकांत १०-१२ खेड्यांचा एक असे भाग केले असून प्रत्येक भागावर एक पाटील निवडलेला असतो व तो जातींतील इतर ५-१० लोकांची संमति घेऊन जातीसंबंधीं प्रश्नांचा निकाल देतो.