विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भद्राचलम्, ज मी न दा री.- मद्रास, गोदावरी जिल्ह्याच्या एजन्सींतील जमीनदारी. क्षेत्रफळ ९११ चौरस मैल. लो. सं. (१९२१) ५००३८. हींत १३७ खेडीं असून भद्राचलम् हें मुख्य ठिकाण आहे. जमीनदारांचा मूळ पुरूष आण्णाप्पा आसवाराव असून त्याला दिल्लीच्या बादशहाकडून स. १३२४ त ही जमीनदारी मिळाली. हींत साबरी नांवाची मोठी नदी असून ती गोदावरीला मिळतें.
गांव.- हें गोदावरीच्या तीरावर आहे. सिरोंच्या व डुम्मागुडम् यांच्यापासून हें अनुक्रमें ४० व १५ मैल दूर आहे. या ठिकाणीं रामचंद्राचें जुनें व प्रख्यात देवालय आहे. प्रतिवर्षीं चैत्रमहिन्यांत येथें यात्रा भरत असते. राजमहेंद्री व समुद्रकिनारा येथून येथपर्यंत नदींतून माल येतो. या ठिकाणीं ब्राह्मण व तेलगू यांचीच संख्या जास्त आहे.