विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भट्टोजी दीक्षित- एक वैय्याकरणी महाराष्ट्रीय ब्राह्मण. इ. स. १६३० च्या सुमारास हा हयात होता. याच्या बापाचें नांव लक्ष्मीधर; याच्या घराण्यांत याच्या पूर्वीं व नंतर व्याकरणावर लिहिणारे अनेक प्रसिद्ध पुरूष झाले. याचा मुलगा भानुभट उर्फ वीरेश्वर उर्फ रामाश्रम. पुतण्या कोंडभट प नातू हरिभट हे प्रख्यात व्याकरणशिक्षक होते. प्रसिद्ध नागोजीभट हा या हरीचा शिष्य होय. जगन्नाथ पंडित म्हणतो कीं, भट्टोजीचा गुरू शेषकृष्ण होता. भट्टोजीनें पाणिनीच्या व्याकरणावर सिद्धांतकौमुदी ही प्रख्यात टीका लिहिली आहे. ही इतकी लोकप्रिय झाली आहे कीं, तिच्यामुळें पाणिनीचें व्याकरण व इतर व्याकरणकारहि मागें पडले. सि. कौ. वर आतांपर्यंत पुष्कळ टीका झालेल्या आहेत. प्रत्यक्ष भट्टोजीनेंच प्रौढ मनोरमा व बाल मनोरमा नांवाच्या दोन टीका लिहिल्या आहेत. पैकीं पहिलीवर जगन्नाथ पंडितानें मनोरमाकुचमर्दिनी टीका लिहिली. ज्ञानेंद्रसरस्वतीची तत्त्वबोधिनी ही सि. कौ. वरील उत्कृष्ट टीका आहे. हेमचंद्राच्या शब्दानुशासनाच्या धर्तीवर सि. कौ. ची रचना आहे असें मेघविजय म्हणतो. भट्टोजीच्या नांवावर वैय्याकरणभूषण, संघ्यामंत्र व्याख्यान, शब्दकौस्तुभ (अष्टाध्यायीवरील टीका, या ग्रंथावरहि उपटीका झाल्या आहेत), अशौचनिर्णय इत्यादि बरेच ग्रंथ आढळतात. यानें उतारवयांत न्यायशास्त्राचा अभ्यास केला होता. हा काशीस वारला. याला मनाजोगता विद्यार्थी न मिळाल्यानें हा ब्रह्मराक्षस झाला व पुढें यानें एका विद्यार्थ्यास व्याकरण शिकवून त्याच्याकडून गति घेतली अशी एक दंतकथा आहे. (पीटर्सन-रिपोर्ट३, ४; कविचरित्र; बेलवलकर- सि.सं. ग्रामर; ऑफ्रेक्ट कोश. )