विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्लॅव्हॅट्स्की, हेलेना पेट्रोव्हेना- या थिऑसॉफिकल सोसायटीच्या संपादकद्वयपैकीं एक होत. १८३१ सालीं या दक्षिण रशियांत जन्मल्या. कर्नल पीटर हान हा त्यांचा बाप व राजकन्या (प्रिन्सेस) डोलगोरोकी यांची मुलगी हेलेन फडीफ ही त्यांची आई; यावरून त्याचें घराणें सरदारी दर्जाचें होतें हें उघड आहे. सतराव्या वर्षीं साठी उलटलेल्या जनरल ब्लॅव्हॅटस्की नांवाच्या रशियांतील एका प्रांताच्या गव्हर्नराशीं त्यांचें लग्न लावण्यांत आलें. लहानपणापासून ब्लॅव्हॅटस्कीबाईचें मन अंतरंगांत मृदु व निर्मळ पण त्यांचा बहिरंगी स्वभाव अभिमानी, संतापी, बंडखोर व जनरीतीस न जुमानणारा असा होता. संसारांत राहण्याची इच्छा नसल्यामुळें लग्नानंतर त्या रशिया देश सोडून प्रवासास निघाल्या व १८७३ सालापर्यंत यूरोप, आफ्रिका, अमेरिका, हिंदुस्थान, तिबेट वगैरे देशांत त्यांनीं अनेक सफरी केल्या. लंडनमध्यें त्यांच्या गुरूची व त्यांची गांठ पडून त्यांस त्यांच्या भावी कार्याची कांहीं कल्पना आली. त्यांच्या या प्रवासाची संपूर्ण हकीकत उपलब्ध नाहीं. पण पुष्कळ श्रेष्ठ विभूतींच्या गांठी पडून त्यांनीं त्यांच्या देखरेखीखालीं आत्मविद्येचा अभ्यास केला असावा असें वाटतें. त्यानीं 'आयसिस अनव्हेल्ड', 'दि सीक्रेट डॉक्ट्रिन', 'की टू थिऑसॉफी', 'दि व्हॉइस ऑफ दि सायलेन्स', वगैरे ग्रंथ लिहिले आहेत. १८९१ सालीं त्या निवर्तल्या. सोसायटींत ज्ञानदानाचें त्यावेळचें सर्व काम यानींच केलें. त्यांची योगशास्त्रांत गति होती. त्यांस सिद्धि प्राप्त झाल्या होत्या व त्या एखादा विषय विशद करण्यासाठीं त्या सिद्धींचा उपयोगहि करून दाखवीत असत. थिऑसॉफीच्या संशोधनास त्यानींच सुरवात करून तें काम बरेंच सिद्धीस नेलें. एक जीवन्मुक्त ॠषि आपले गुरू आहेत असें त्या म्हणत. धर्माच्या अंतरंगाविषयीं त्यांचें ज्ञान खोल होतें. शब्दज्ञानाच्या पलीकडे ज्यांस जावायाचें असेंल अशांसाठीं त्यानीं थिऑसॉफिकल सोसायटीच्या आंत एक संप्रदाय स्थापिला होता व तो अद्याप सुरळीतपणें चालू आहे. जनरीतीस जुमानीत नसल्यामुळें त्या पुष्कळांस अप्रिय होत असत. 'दि सीक्रेट डॉक्ट्रिन' हा त्यांचा ग्रंथ थिऑसॉफीच्या वाङ्मयाचा मुकुटमणि होय; या ग्रंथाची पृष्ठसंख्या सुमारें २२०० आहे. ''ज्ञानसूत्रें'' नामक सूत्रांवर यांत भाष्य असून त्यांत अनेक विषय येऊन गेले आहेत. हा ग्रंथ स्वतःच्या अनुभवानें व स्वतःपेक्षां ज्ञानी असणा-या ॠषितुल्य माणसांच्या साहाय्यानें त्यानीं लिहिला असें थिऑसफिस्ट मानतात. (ले. रा. स. भागवत.)