विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्लॅक, जोसेफ (१७२८-१७९९)- एक स्कोंच पदार्थ विज्ञानी व रसायनशास्त्रज्ञ. ब्लॅक यानें असें सिद्ध केलें कीं खडूंत दाहकता येण्याकरितां त्यांतून कांहीं पदार्थ बाहेर जातो हा बाहेर जाणारा पदार्थ एक प्रकारचा वायु आहे. याला पुढें इ. स. १७८१ त लव्हायझर यानें कर्बद्विप्राणिल असें नांव दिलें. यानें असेंहि दाखविलें कीं मग्नकर्बनित तापविला असतां त्याचें वजन कमी होतें हा मग्नदाहक पुन्हां हवेंत ठेवल्यास मग्नकर्बनित बनतो. या शोधानें रसायनशास्त्रांत हवेच्या व्यतिरिक्त एका वायूची भर पडली व तराजूचा योग्य उपयोग करण्यांत त्यानें लव्हायझरादि शास्त्रज्ञांवर मात केली. तो वैद्य म्हणूनहि प्रसिद्धीस आला होता. याशिवाय गूढोष्णतेच्या शोधाकडे त्याचें लक्ष वेधलें होतें. त्यानें विशिष्ट उष्णता व पदार्थांचें उष्णतेच्या योगानें होणारें प्रसरण या शोधांची प्रस्तावना केली. त्याचीं भाषणें व त्याचे लेख त्याच्या निधनानंतर प्रसिद्ध झाले व त्याचा मित्र जॉन रॉबिन्सन यानें त्या ग्रंथाला ब्लॅकचें संक्षिप्त चरित्र व प्रस्तावना जोडली आहे. ''एडिंबरो विद्यालयांतील रसायन शास्त्रावरील व्याख्यानें'' असें त्या ग्रथांचें नांव आहे.