विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रेस्लॉ- जर्मनी. सायलेशिया नांवाच्या प्रशियन प्रांताच्या राजधानीचें शहर. लोकसंख्या (१९१९) ५२८२६०. विश्वविद्यालय, कलाकौशल्याच्या कामांचा व पुराणवस्तूंचा अजबखाना, हुंडीबाजार, नाटकगृह, मुख्य रेल्वेस्टेशन, टपालकचेरी इत्यादि अनेक प्रक्षेणीय इमारती या शहरांत आहेत. पहिला विल्यम, बिस्मार्क, मोल्टके आदिकरून प्रसिद्ध पुरूषांचीं येथें अगणित स्मारकें आहेत. यहुदी लोकांचें कॉलेज म्हणून, येथील विश्वविद्यालयाची १७०२ सालीं प्रथम स्थापना झाली. १८११ सालीं ओडरवरील फ्रँकफोर्टचें विश्वविद्यालय जेव्हां यांस जोडलें गेलें तेव्हां हें विश्वविद्यालय बरेंच मोठें झालें. याच्या ग्रंथसंग्रहलयांत ३,०५,००० पुस्तकें व ४००० हस्तलेख असून त्यांत पौरस्त्य वाङ्मयाचा ग्रंथांचा पुष्कळ भरणा केला आहे. याला जोडूनच वनस्पतिबाग, वेधशाळा आणि शारीरशास्त्राच्या, इंद्रियविज्ञानशास्त्राच्या व तशाच आणखीहि कित्येक संस्था आहेत. शहरांत शाळा, दवाखाने व धार्मिक संस्था असंख्य असून मुलींच्या उच्च शिक्षणासाठीं दोन विद्यालयें आहेत.
येथील व्यापार व उद्योगधंदे वाढत आहेत. या ठिकाणचे मुख्य जिन्नस म्हटले म्हणजे धान्य, कोळसा, साखर, मद्यें, पेट्रोलियम, व इमारती लांकूड हे होत. यंत्रें, हत्यारें, आगगाडीचे व ट्रामचे डबे, बिडाचें सामान, सोन्या रूप्याचें काम, सुतीं व लोंकरीचीं वस्त्रें, सतरंज्या, वाद्यें, कांच सामान, चिनीमातीचीं भांडीं इत्यादि वस्तू या ठिकाणीं तयार होतात.