विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रूस्टर, सर डेव्हिड (१७८१-१८६८)- एक पदार्थविज्ञानशस्त्रज्ञ. यानें प्रकाशाच्या विकृतिसंबंधीं जे शोध लाविले त्यांची यादी अशी-(१) परावर्तन आणि वक्रीभवन यांच्या योगानें होणारें प्रकाशाचें ध्रुवीभवन; व एतत्संबंधीं कांहीं नियम. (२) दाब आणि उष्णता यांच्या योगानें उत्पन्न होणारें ध्रुवीभवन. (३) दोन अक्षरेषा असणा-या स्फटिकाच्या योगानें उत्पन्न होणारें द्विवक्रीभवन आणि तद्विषयक माहिती. (४) धातुमय परावर्तनाचे नियम. (५) प्रकाशाच्या अपशोषणाविषयीं प्रायोगिक माहिती. याशिवाय पुढील महत्त्वाच्या तीन भागासंबंधानें त्यानें उत्तम शोध लावले आहेत. (१) वक्रीभवनाचा गुणक आणि ध्रुवीभवनाचा कोन यांचा परस्परसंबंध, (२) दोन अक्षरेषा असणारे स्फटिक, व (३) विषम उष्णता लाविल्यानें उत्पन्न होणारें द्विवक्रीभवन.
शास्त्रीय शोधांव्यतिरिक्त त्यानें कांहीं बाबतींत बरेच परिश्रम केले आहेत त्यांत क्यालिडास्कोप आणि घनचित्रदर्शक यंत्र यांचा उल्लेख केला पाहिजे. दीपगृहांतील दिव्यांतहि त्यानें कित्येक सुधारणा केल्या.