विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रुनेई- ब्रिटिश वोर्निओ, एक संस्थान. या संस्थानचें क्षेत्रफळ सुमारें ४००० चौरस मैल आहे. १८८८ सालीं हें संस्थान ब्रिटिश संरक्षणाखालीं आलें. १९०६ सालीं ब्रुनेईच्या सुलतानानें राज्याचीं सूत्रें ब्रिटिश रेसिडेंटाच्या ताब्यांत दिलीं. त्याच सालीं सुलतान सर महम्मद जॅमाल-डल्-अलम गादीवर आला. याला संस्थानच्या खजिन्यांतून १४०० पौंड वर्षासन मिळतें. व त्याच्या दोन प्रधानांनां प्रत्येकीं ७०० पौंड मिळतात. सर्व संस्थानाची लोकसंख्या सुमारें २५००० आहे. जरीचें कापड व साबुदाणा हे जिन्नस येथें तयार होतात. ब्रुनेई शहर ही राजधानी असून त्याची लोकसंख्या सुमारें १०००० आहे.