विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रिस्टल- इंग्लंडचें एक बंदर व बरो. १९०१ सालीं येथील लोकसंख्या ३२८९४५ होती. ग्रेटवेस्टर्न रेल्वेशिवाय त्याच कंपनीच्या लोकल गाड्या येथें आहेत. टेंपलमीडस् हें मुख्य स्टेशन आहे. आठव्या हेनरीनें १५४२ सालीं ब्रिस्टल येथें विद्यापीठ स्थापन केलें.
येथें बरींच व चांगलीं प्रार्थनामंदिरें आहेत. याच शहरीं १७७४ सालीं रॉबर्टसौदे कवीचा जन्म झाला.धान्य, फळें, तेलें, खनिज पदार्थ, इमारतीचें लांकूड, कांतडीं व गुरें हा येथील मुख्य आयात माल असून सुती कापड, कथील व मीठ हा येथील मुख्य निर्गत माल आहे. येथें जहाजें बांधणें चाकोलेट, साखर, तंबाखू, कांच, साबू, जोडे, कमावलेले कातडें, तांब्याचें, जस्ताचें, व दारू वगैरेंचे कारखाने येथें आहेत. कोळशाच्या खाणीहि आहेत.