विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राह्मसमाज- हिंदु धर्मामध्यें प्राचीन काळापासून जे अनेक पंथ उपपंथ निर्माण झाले, व अद्यापिहि होत आहेत त्यांपैकीं ब्राह्मसमाज हा अर्वाचीन काळांतील एक पंथ होय. या पंथाचा जन्म, व वाढ हीं मुख्यतः बंगालमध्यें झालीं. राजा राममोहनराय हा या पंथाचा आद्य संस्थापक होय. राजा राममोहनराय हा अर्वाचीन काळांतील धर्मसुधारकांपैकीं प्रमुख धर्मसुधारक होय. हिंदु धर्मांत त्याच्या मतें जे अनेक घोंटाळे माजले होतें ते नाहिसे करूंन हिंदुधर्म पुन्हां उज्वल करावा अशी त्याची इच्छा होती. मूर्तिपूजा अगर अनेक देवतापूजा यांच्या तो अगदीं विरूद्ध होता. सर्व जगाचा जनक आणि पालक असा एक परमेश्वर असून तो नित्य व अनामधेय आहे असें त्याचें मत होतें, व तें मत प्रस्थापित करण्यासाठीं आत्मीय सभा, वेदमंदिर इत्यादि धर्मसंस्था त्यानें स्थापन केल्या. या सभांमध्यें त्याचे आपल्या स्नेह्यांशीं धर्मासंबंधीं अनेक वादविवाद होत असत, पण याप्रमाणें धार्मिक विषयावर नुसते वाद करण्यानें त्याच्या मनाला समाधान प्राप्त होईना. एकेश्वरी पंथाचें एखादें प्रार्थनामंदिर असावें असें त्याला रात्रंदिवस वाटत असे .शेवटीं त्यानें १८२८ सालीं ब्राह्मसभा नावांची सभा स्थापन केली. थोडक्याच दिवसांत ब्राह्मसभा हें नांव बदलून ब्राह्मसमाज हें नांव अस्तित्वांत आलें. पुढें ब्राह्मसमाजासाठीं चितपोर रस्त्यावर एक प्रशस्त जागा विकत घेण्यांत येऊन तेथें ब्राह्मसमाजाची स्थापना स. १८३० च्या जानेवारींत २३ तारखेस जाहीर रीतीनें करण्यांत आली. राममोहनरायनें हा जो ब्राह्मसमाज स्थापन केला व त्याला जे अनुयायी मिळाले त्यांमध्यें राजा द्वारकानाथ ठाकूर, कालीनाथराय, मथुरनाथ मलीक, प्रसन्नकुमार टागोर, चंद्रशेखर देव, रामचंद्र विद्यावागीश हे प्रमुख होतें. या समाजाची सभा दर शनिवारीं संध्याकाळीं ७-९ वाजेतों भरत असे. सभेला सुरवात होण्यापूर्वीं, कांहीं वैदिक मंत्रांचें पठण होत असे. नंतर उपनिषदांतील कांहीं भागांचें वाचन व त्यांचें बंगालीमध्यें भाषांतर करण्यांत येई. तदनंतर बंगालीमध्यें एखाद्याचें प्रवचन होत असे व शेवटीं पुन्हां कांहीं मंत्राचें पठण होऊन सभेची बैठक बरखास्त होत असे. या मंत्रपठणासाठीं दोन तेलगू ब्राह्मणांची योजना झालेंली होती. व उत्सवानंद विद्यावागीश याच्याकडे उपनिषदांतील कांहीं भाग वाचण्याचें व रामचंद्र विद्यावागीशाकडे त्याचें बंगाली भाषेंत भाषांतर करण्याचें काम असे. या सभेला ६०/७० लोक जमत असत. राममोहनरायाला हिंदु धर्माचा अभिमान असल्यामुळें व वैदिक मंत्रांचा-ज्या सभेमध्यें सर्व जातींचे लोक जमतात अशा ठिकाणीं-भरसभेंत उच्चार होऊं नये यासाठीं वैदिक मंत्रपठणाचें काम एका सभेच्या मंदिरांतील एका स्वतंत्र खोलींत चालावें व बाहेरच्या मंडळीनें तें ऐंकावें अशीं त्यानें व्यवस्था केली होती. राममोहनरायनें इंग्लंडला जातेवेळीं ही संस्था महराजा रामनाथ ठाकोर, कालीनाथ मुनशी व आपला मुलगा राधाप्रसाद या तिघांच्या ताब्यांत दिली. पुढें इंग्लंडमध्यें राममोहनराय मरण पावला. त्याच्यानंतर ५/६ वर्षेंपर्यंत समाज कसाबसा अस्तित्वांत होता म्हटलें तरी चालेल. पण १८४१ सालीं या समाजाला देवेंद्रनाथ टागोर व त्याचे स्नेही येऊन मिळाल्यामुळें समाजाला पुन्हां चैतन्य प्राप्त झालें. १८४३ सालीं देवेन्द्रनें तत्त्वबोधिनी पत्रिका नांवाचें पत्र काढलें. अक्षय्य कुमारदत्त हा त्याचा संपादक होता. याच्या संपादकत्वाखालीं तत्त्वबोधिनी पत्रिका हें पत्र अत्यंत लोकप्रिय झालें व त्यामुळें अप्रत्यक्षपणें ब्राह्मसमाजाचा दर्जा बंगालमध्यें वाढला. ब्राह्मसमाज जर कायम टिकवायचा असेल तर तो सुसंघटित व नियमबद्ध असला पाहिजे असें देवेंद्राचें ठाम मत होतें. यासाठीं समाजाची सुसंघटना असावी एतदर्थ त्यानें नियम तयार केले. त्यांपैकीं दोन मुख्य नियम म्हणजे मूर्तिपूजा न करणें व परमेश्वरावर अनन्य प्रेम ठेवून त्याला आवडतील अशीं कार्यें करण्याचा प्रयत्न करणें हे होत. प्रथमतः या समाजाला वेदांचें प्रामण्य कबूल होतें पण पुढें वेदांनांहि मूर्तिपूजेचें तत्त्व मान्य आहे असें सिद्ध झाल्यामुळें या समाजाला वेदप्रामाण्याचा त्याग करावा लागला. अर्थात वेदत्यागामुळें समाजाच्या धार्मिक मतांत क्रांति घडून आली. थोडक्याच काळांत देवेंद्रानें ब्राह्मसमाजाची नवीन तत्त्वांवर पुनर्घटना केली. तीं तत्त्वें पुढील प्रमाणें होतीं: (१) परमेश्वर हा सगण व कल्याणगुणमंडित आहे; (२) त्यानें कधींहि अवतार घेतला नाहीं; (३) तो भक्तांची प्रार्थना ऐकतो व तो प्रार्थनेचें फल देतो; (४) परमेश्वराची उपासना आध्यात्मिक मार्गांनीं केली पाहिजे. संन्यास, मूर्तिपूजा इत्यादि परमेश्वरप्राप्तीचे मार्ग अनवश्यक आहेत; (५) पश्चात्ताप व पापनिवृत्ति हाच परमेश्वरी कृपेचा व मोक्षाचा मार्ग आहे; (६) परमेश्वराविषयींच्या ज्ञानाला प्रकृतिज्ञान व अंतर्ज्ञान हीं आवश्यक आहेत; एतद्विषयक ज्ञानप्राप्तीच्या बाबतींत कोणताहि धर्मग्रंथ प्रमाणभूत नाहीं.
या नवीन तत्त्वाच्या आधारें ब्राह्मसमाजाची पुनर्घटना झाल्यावर हळूहळू या समाजाची प्रगति होऊं लागली. तथापि प्रत्यक्ष रीतीनें सामाजिक अगर धार्मिक सुधारणेची चळवळ करण्याचें काम ब्राह्मसमाजानें अद्यापिहि हातांत घेतलें नव्हतें पण १८६० सालीं देवेंद्राचा पट्टशिष्य केशवचंद्र सेन यानें संगतसभा स्थापन करून ही चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला. या संगतसभेंत हिंदु धार्मिक विधींवर वादविवाद होत असत व त्या वादानंतर जें ठरेल त्याप्रमाणेंच समाजांतील सभासद वागत असत. त्याप्रमाणें देवेंद्रानें 'अनुष्ठानपद्धति' नांवाचें एक पुस्तकहि प्रसिद्ध केलें व त्यानें स्वतःच्या जानव्याचाहि त्याग केला. या समाजातर्फें केशवचंद्र हा दुष्काळग्रस्तांनां मदत करणें इत्यादि प्रकारचीं परोपकारी कार्येंहि करीत असे. देवेंद्राचें केशवचंद्रावर अतिशय प्रेम असें व त्यामुळें केशव हा खालच्या जातींतला असूनहि देवेंद्रानें ब्रह्मसमाजाच्या आचार्यपदावर केशवचंद्राची प्रतिष्ठापना केली. यानंतर केशवानें बंगालभर दौरा काढून ब्राह्मसमाजाच्या तत्त्वांचा प्रसार करण्यास सुरवात केली. मुंबई व मद्रास येथें जाऊनहि त्यानें व्याख्यानें दिलीं.
केशवचंद्र हा ब्राह्मसमाजाला मिळाल्यापासून ब्राह्मसमाजाची प्रगति होत गेली. तथापि सामाजिक सुधारणेवर केशवचंद्रानें विशेष भर दिल्यामुळें ब्राह्मसमाजाचें आध्यात्मिक स्वरूप नाहींसें होऊं लागलें हें देवेंद्रादिक जुन्या मंडळींनां आवडेना. उदाहरणार्थ, मिश्रविवाहाला केशवचंद्र हा अनुकूल होता. पण देवेंद्र व त्याचे अनुयायी हे तयार नव्हते. त्यामुळें देवेंद्र व केशव यांच्यामध्यें फाटाफूट होऊन, १८६६ सालीं केशवचंद्रानें, भारतवर्षीय ब्राह्मसमाजाची स्थापना केली आणि जुन्या ब्राह्मसमाजाला 'आदिब्राह्मसमाज' असें नांव रूढ झालें. केशवचंद्रानें हा जो नवीन समाज काढला त्यांत त्यानें नवीन तत्वें घुसडून दिलीं. वैष्णव भक्तिमार्गाचा त्यानें या नवीन समाजांत अंतर्भाव केला, नगरकीर्तनपद्धति पुन्हां चालू केली, महान साधूंच्या जयंत्या करण्याची पद्धत समाजातर्फें सुरू झालीं, स्वतःत्यानें पुष्कळ ठिकाणीं व्याख्यानें देऊन आपल्या नवीन मतांचा प्रसार केला.
केशवाच्या अहंमन्य व अरेरावी वागणुकीमुळें खुद्द त्याच्या समाजांतील लोकांचें मत त्याच्याविरूद्ध बनूं लागलें. याच सुमारास त्यानें कुचबिहारच्या तरूण राजाला आपली लहान मुलगी दिल्यामुळें त्याच्या समाजांत चांगलींच फूट पडली. आणि त्याच्या विरूद्ध असणा-या मंडळींनीं 'साधारण ब्राह्मसमाज' या नांवाची निराळीच संस्था स्थापन केली. या नवीन समाजाचीं मूलतत्त्वें आदिसमाजाचींच होतीं; फक्त त्यांमध्यें साधारण समाजानें तीन नवीन तत्त्वें अंतर्भूत केलीं; तीं म्हणजे-(१) परमेश्वर हा सर्वांचा पिता असून सर्व मनुष्यें हीं परस्परांचे बंधू होत; (२) आत्मा हा अमर असून तो नित्य प्रगमनशील आहे;(३) परमेश्वर हा पुण्याचें फल देतो व पापी लोकांनां शिक्षा करतो पण त्याची शिक्षा नित्य नसून तात्पुरती असतें. साधारणसमाजाचा मुख्य शिवनाथशास्त्री हा होता.
१८८१ सालाच्या जानेवारी महिन्यांत ब्राह्मसमाज्याचा वार्षिक दिनदिवशीं केशव हा आपल्या बारा अनुयायांसह एक तांबडें निशान घेऊन सभेला आला. त्या निशाणावर 'नवविधान' हीं अक्षरें लिहिलीं होतीं. या दिवशीं त्यानें आपल्या भाषणांत ब्राह्मसमाज हा परमेश्वराकडे नेणारा अगदीं अर्वाचीन पंथ असून त्या पंथाचा प्रसार करणारे आपण व आपले बारा अनुयायी हे देवदूत आहों, असें प्रतिपादन केलें. अशा रीतीनें केशवानें नवविधानसमाज स्थापन केला. या समाजसमध्यें त्यानें हिंदु व ख्रिस्ती धर्मांतील अनेक विधींचा अंतर्भाव केला. सभासद होण्यासाठीं दीक्षा व साधारण भोजन करण्याची पद्धत त्यानें पाडली, एक प्रकारचा गूढ नाच करण्यास त्यानें प्रारंभ केला व याहिपुढें जाऊन आपण जादूगार आहों असें सिद्ध करण्याचा त्यानें प्रयत्न चालविला. १८८२ सालीं त्यानें ख्रिस्ती लोकांचा त्रिमूर्तिवाद समाजाच्या मूलतत्त्वांत प्रविष्ट केला. अशा रीतीनें या नवीन समाजाचीं मूलतत्त्वें म्हणजे साधारण समाजाचीं तत्त्वें आणि (१) परमेश्वर हा मूळांत एक असून तो बाप व मुलगा व पवित्रभूत या त्रिमूर्तीनें व्यक्त झाला आहे; (२) ब्राह्मसमाज हा परमेश्वरप्राप्तीचा अगदीं नवा पंथ आहे, व त्याचे प्रसारक हे या नवीन तत्त्वांचे आदेशक आहेत; (३) परमेश्वराचें ज्ञान विभूतींच्या द्वारें होतें; इत्यादी होत. केशवचंद्र १८७३ सालीं वारला. त्यानंतर या समाजाला उत्तरोत्तर उतरती कळा लागली. आदिसमाज हाहि कसाबसा जीव धरून आहे. साधारण समाजाची मात्र सावकाश कां होईना पण प्रगति होत आहे. ('केशवचंद्रसेन' व 'टागोर, देवेंद्रनाथ' पहा.)
प्रार्थनासमाज हा ब्राह्मसमाजाचेंच एक अपत्य असल्यानें त्याचा इतिहास या ठिकाणीं देणें सयुक्तिक होईल.
प्रा र्थ ना स मा ज.- इंग्रजी विद्येचा प्रसार झाल्यापासून जो नवीन मनु सुरू झाला त्यामुळें ज्याप्रमाणें बंगालमध्यें ब्राह्मसमाज अस्तित्वांत आला त्याचप्रमाणें व मुख्यतः ब्राह्मसमाजाच्या अनुकरणेंच्छेनें मुंबई इलाख्यांत प्रार्थनासमाज अस्तित्वांत आला. प्रार्थनासमाजाची स्थापना १८६७ सालीं झाली. हा स्थापन करणा-यांमध्यें डॉ. आत्माराम पांडुरंग, बाळ मंगेश वागळे, नारायण महादेव परमानंद इत्यादि माणसें प्रमुख होतीं. ईश्वरोपासना व समाजसुधारणा हे दोन उद्देश समाजसंस्थापकांनीं डोळ्यापुढें ठेवले होतें. या संस्थापकांमध्यें आरंभीं कर्तृत्वान असा कोणीहि मनुष्य नव्हता. पण न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे व डॉ. भाण्डारकर ही जोडी समाजाला येऊन मिळाल्यावर या समाजाला एक प्रकारचें महत्व प्राप्त झालें. १८७४ सालीं गिरगांवमध्यें (मुंबई) समाजाची स्वतंत्र इमारत बांधण्यांत आली.न्यायमूर्ति रानडे वारल्यानंतर प्रार्थनासमाजाचें नेतृत्व मुंबईस न्यायमूर्ति चंदावरकर व पुण्यास डॉ. भाण्डारकर यांचयावरच पडलें व तें त्यांनीं आपल्या हयातीपर्यंत चांगल्या त-हेनें बजावलेंहि तथापि बंगालमध्ये ब्राह्मसमाजाला ज्याप्रमाणें कर्तृत्वान प्रसारक मिळाले तशा प्रकारचे प्रसारक प्रार्थनासमाजाला न मिळाल्यामुळें समाजाची फारशी भरभराट कधींच झालीं नाहीं. प्रार्थनासमाजाच्या शाखा अहमदाबाद, पुणें, खडकी, कोल्हापूर, सातारा या ठिकाणीं आहेत. मद्रास इलाख्यांत या समाजाच्या १८ शाखा आहेत. समाजाचीं मूलभूत तत्त्वें बहुतेकांशीं साधारण ब्राह्मसमाजाच्या तत्वासारखींच आहेत. प्रार्थनासमाजामध्यें व ब्राह्मसमाजामध्यें विशेष फरक म्हणजे ब्राह्मसमाजाप्रमाणें प्रार्थनासमाजांत दाखल होणा-या इसमाला 'मी मूर्तिपूजा करणार नाहीं व जातिभेद पाळणार नाहीं' अशी शपथ घ्यावी लागत नाहीं, हा होय. ईश्वरोपासनेच्या वेळीं नामदेव, तुकाराम इत्यादि भक्तिमार्गीय साधुसंतांच्या अभंगाचा उपयोग यांत केला जातो. अशा रीतीनें ब्राह्मसमाजापेक्षां प्रार्थनासमाज हा हिंदुधर्माला विशेष जवळचा आहे. यांत ईश्वरोपासना ब्राह्मसमाजांतील उपासनेप्रमाणेंच चालविली जाते. ज्या ज्या प्रांताची जी भाषा असेंल त्या भाषेंतून प्रार्थना चालविली जाते. समाजाचें वाङ्मय बरेचसें मराठींत आहे. इंग्रजीमध्यें फार थोडें आहे. रविवारच्या ईश्वरोपासनेशिवाय मुंबईच्या प्रार्थनासमाजानें 'यंग थीइस्ट्स यूनियन', 'संडेस्कूल', 'दि पोस्टल मिशन' व 'सुबोध पत्रिका पत्र' या संस्था चालविल्या आहेत. याशिवाय समाजातर्फें मुंबईमध्यें मुलामुलींसाठीं शाळा, अनाथगृहें, व पंढरपुरास अनाथ विधवागृह इत्यादि संस्था काढण्यांत आलेल्या आहेत. ब्राह्मसमाजाप्रमाणेंच प्रार्थनासमाजाच्या सभासदांची संख्या कमी आहे. तथापि या दोन्ही समाजांनीं समाजसुधारणेच्या बाबतींत बरीच प्रगति घडवून आणली असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं.