विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राह्मपुराण- किंवा ब्रह्मपुराण. सर्व पुराणांतील याद्यांत हेंच प्रथम दिलेलें आहे, आणि म्हणून या पुराणाला आदिपुराण असेंहि क्वचित म्हटलेलें आढळतें. याच्या प्रस्तावनेंत असें म्हटलें आहे कीं, नैमिषारण्यामध्यें ॠषींनां भेटण्याकरतां सूत लोमहर्षण आले तेव्हां ऋषींनीं त्यांनां जगाची उत्पत्ति व लय यांबद्दल सांगण्यास सांगितलें. तेव्हां सूतानीं उत्तर दिलें कीं, मनुष्यजातीच्या आद्य पूर्वजांपैकीं, जो दक्ष त्याला उत्पत्तिकर्ता ब्रह्मदेव यानें एकदां जें सांगितलें होतें, तेंच पुराण मी तुम्हास सांगणार आहे. इतकें झाल्यावर, सर्व पुराणांतून कमजास्त मानानें असलेली जगदुत्पत्ति कथा, मूळपुरूष मनु व त्याच्या वंशजांचे जन्म, देव-उपदेव यक्ष-गंधर्व वगैरे भूतमात्रांची उत्पत्ति, तसेंच पृथ्वी व तिचीं खंडें व स्वर्गपाताळ वगैरे अनेकांबद्दलच्या दंतकथा या पुराणांत दिलेल्या आहेत. यालाच जोडून तीर्थयात्रांची व पवित्र स्थलांची यादी दिली आहे. यांच्या शेवटीं पवित्र क्षेत्र उत्कल (हल्लींचें ओरिसा) यांचें माहात्म्य दिलें असून त्यानेंच या पुराणाचा पुष्कळ भाग व्यापिला आहे. उत्कल क्षेत्राला पावित्र्य सूर्यापासनेमुळें आलें आहे, व म्हणून आदित्यांच्या आणि सूर्यदेवतेच्या उत्पत्तीबद्दल कल्पितकथा त्यांतच दिल्या आहेत. पुढें उत्कल येथील शिवाच्या पवित्र अरण्याचें वर्णन आलें आहे व त्यालाच जोडून हिमालयाची कन्या डमा हिचा जन्म, तिचा व शंकराचा विवाह व शिवाबद्दल आणखीहि पुष्कळ कथा दिल्या आहेत. विष्णूमुळें पवित्र असलेल्या उत्कल येथील एका भागांचे वर्णन देतांना विष्णूच्या महात्म्याबद्दल दंतकथा दिल्या आहेत. या ठिकाणींच पश्चात्ताप करणा-या कंदूची रम्य कथा सांगितली आहे. यानें सुंदर अप्सरांबरोबर मधुर श्रृंगारचेष्टा करण्यांत शेकडों वर्षें घालविलीं; आणि काममद उतरल्यानंतर शेवटीं तो भानावर आला व इतक्या वर्षांचा काळ त्याला थोड्याशा तासांप्रमाणें वाटला.
पुढें विष्णूच्या अवतारांच्या कथा आहेत; आणि त्यांच्या पुढें, अगदीं विष्णुपुरांणांतल्याप्रमाणेंच कृष्णाच्या ठराविक गोष्टी वर्णिल्या आहेत. नंतर श्राद्धकर्म, विष्णूचे व्रतोत्सव, काल-विभाग-वर्णन, जगाचीं युगें, कलियुगांतील मनुष्याप्राण्यांची अवनति, आणि नंतर क्रमप्राप्त जगाचा प्रलय यांचें वर्णन देऊन शेवटीं सांख्य आणि योगशास्त्राची माहिती दिली आहे.
ओरिसामधील देवालयांच्या स्थापनेच्या उपलब्ध असलेल्या सनांच्या आधारावरून विलसननें असें ठरविलें आहे कीं, हें ब्रह्मपुराण बहुतेक ओरिसामाहात्म्यच आहे. हें १३ व्या किंवा १४ व्या शतकांत लिहिलेलें असावें, परंतु हा निर्णय बरोबर नाहीं असें विटरनिट्झचें मत आहे. कदाचित ओरिसामधील क्षेत्रांचें वगैरे वर्णन असलेला यांतील भाग वरील शतकांतला असेंल; पण तो ब्रह्मपुराण ह्या जुन्या ग्रंथांत मागून सामील केलेला असावा. ब्रह्मपुराणाचें जें उत्तरखंड म्हणून आहे त्याचा मूळ पुराणाशीं कांहींच मेळ नसून तें एखाद्या पवित्र नदीचें माहात्म्य आहे.