विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राउनिंग रॉबर्ट (१८१२-१८८९) एक सुप्रसिद्ध आंग्ल कवि. लहानपणापासुन याला काव्यें वाचण्याचा नाद असें. १८३३ सालीं पॉलीना हें त्याचें पहिलें काव्य बाहेर पडलें. १८३५ सालीं पारासेलसस ही त्याची कविता प्रसिद्ध झालीं व त्यामुळें कॉर्लाईल, वर्डस्वर्थ इत्यादि विद्वानांचें त्याच्याकडे लक्ष वेधलें १८३७ सालीं स्ट्रॅफोर्ड नांवाचें त्याचें नाटक रंगभूमीवर आलें. व १८२० त सॉर्डेलो काव्य प्रसिद्ध झालें. त्यानंतर १८४१ सालीं 'बेल्स अँड पमग्रँनेट्स' १८४३ सालीं 'ए ब्लॉट इन दि स्कुशोन' (नाटक) 'ल्युरिया' व 'सोल्सट्रॅजेडी' (१८४६) इत्यादि ग्रंथ त्यानें लिहिले. त्याची प्रसिद्ध कविता 'पिपा पासेस' बेल्स अँड पमग्रॅनेट्स या कवितासंग्रहांत आढळतें. १८४६ सालीं त्यानें इलिझाबेथ बॅरेट नांवाच्या एका तरूणीशीं विवाह केला. यांचें परस्परांवर अत्यंत प्रेम होतें. १८०५ सालीं 'ख्रिस्तमस ईव्ह अँड ईस्टर डे' ही त्याची कविता प्रसिद्ध झालीं. १८५५ सालीं 'मेन अँड वुइमेन' हें काव्य बाहेर पडलें. पुढें त्यानें ड्रमॅटिस परसोनी (१८६४) दि रिंग अँड दि बुक (१८६८-६९) बॅलॉस्टियनस अँडव्हेंचर; प्रिन्स होएन स्टील स्वंगाऊ (१८७१); फिफाइन अँट दि फेयर (१८७२) रेड कॉटन नाइट केप कंट्री (१८७३) दि इन अलबम (१८७५) पॉश्चिआसेटी (१८७६) ला सैसिया (१८७८) अगॅमॅम्रानचें भाषांतर (१८७९) ड्रॅमॅटिक आयडीयल्स (१८७९-८०); अँसोलँडो ; (१८०९) इत्यादि अनेक काव्यें त्यानें लिहिलीं. प्रथमतः त्याच्या काव्याची फारशी चहा झालीं नाहीं तथापि त्याचीं ज्यावेळीं काव्यावर काव्यें बाहेर पडूं लागलीं त्यावेळीं त्याच्या काव्याकडे समाजाचें लक्ष वेधलें व त्याच्या काव्यांचें परीक्षण होऊं लागलें. ब्राउनिंग हा हल्लीं इंग्लंडच्या कविमंडळातील एक प्रमुख कवि मानण्यांत येतो. त्याच्या कवितेंत गंभीर विचार, विचारवैचित्र्य दृढतर मनोभावना, इत्यादि गुण दृष्टीस पडतात. त्याची बायको इलिझाबेथ हीहि चांगल्या प्रकारचीं कवयित्री होती. तिची प्रामीथस अनवाउंड, दि रोमांट ऑफ मार्गारेट, दि रोमाट ऑफ दि पेज, दि पोएट्स व्हाऊ, दि कॅसा गुइडि विंडोज, दि ऑरोरॉ ले, दि सॉनेटस फ्रॉम दि पोर्तुगीज, इत्यादि कविता प्रसिद्ध आहेत.