विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रह्म– नामरूपात्मक पदार्थांच्या बुडाशीं असणारें जें मुलभूत नित्य व अव्यक्त तत्त्व याला वेदान्तांत ब्रह्म असें म्हणतात. पण ब्रह्मासंबंधींची ही कल्पना अगदीं प्रारंभापासून होती, असें म्हणतां यावयाचें नाहीं. ॠग्वेदांत ब्रह्म हा शब्द आढळतो, पण तेथें त्याचा अर्थ बाह्यसृष्टीच्या मूलाशीं असणारें नित्य द्रव्य असा नाहीं. सायणानें बह्म या शब्दाचे आपल्या ॠग्वेद भाष्यांत निरनिराळे अर्थ केलेंले आढळतात. ते म्हणजे अन्न, स्तुति, अभिचार मंत्र, विधि, दानस्तुति, होत्याचें मंत्रपठण, व मोठें. ब्रह्म हा शब्द बृह= वाढणें यापासून आला आहे असें प्राचीन ग्रंथकार म्हणतात. हौगच्या मतें ॠग्वेदांत ब्रह्म हा शब्द अभिचार अगर गुढशक्ति या अर्थी वापरण्यांत आला आहे पण मंत्र अगर स्तुति या अर्थींहि तो ॠग्वेदकालीं वारण्यांत येत होता, यांत शंका नाहीं. वैदिक कालीं ब्रह्माची देवता बृहस्पति होती. पुढें ब्रह्मणकाळीं ब्रह्म या शब्दाचा अर्थ स्तुति अगर प्रार्थना एवढाच न रहातां, ज्ञान या अर्थानेंहि त्याचा उपयोग करण्यांत येऊं लागला. शतपथ ब्राह्मणांत 'ब्रह्म' हा शब्द श्रेष्ठ तत्त्व व देवांची प्रेरक शक्ति या अर्थीं वापरलेला आढळतो. याच ब्राह्मणांत एके ठिकाणीं ब्रह्म हें ओंकारस्वरूपी आहे असें म्हटलें आहे. अशा रीतीनें ब्रह्माच अर्थ अधिकाधिक व्यापक होत जाऊन सर्व बाह्य सृष्टीच्या मुळाशीं असलेलें नित्य द्रव्य असा त्याचा अर्थ उपनिषद्काळामध्यें रूढ झाला. अशा रीतीनें ब्रह्म हें चराचर सृष्टीचें मुळतत्त्व असें मानण्यांत येऊं लागल्यावर त्याच्या स्वरूपांसबंधीं उपनिषद्कांरानीं अनेक सिद्धांत काढण्यास सुरवात केली. ब्रह्मासंबंधीं ज्यांमध्यें विचार केला असतो अशा शास्त्राला ब्रह्मविद्या असें म्हणतात. ब्रह्मासंबंधीं अनेक दृष्टींनीं विचार केल्यावर शेवटीं ब्रह्मस्वरूप निर्गुण असुन त्याचें ज्ञान होण्यास त्याचा अपरोक्षानुभवच यावा लागतो, असें शास्त्राकारांनीं प्रतिपादन केलें आहे.