विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोहरा– एक व्यापारी मुसुलामान जात. यांची एकंदर संख्या (१९११) १८७७४२ असून तींपैकीं १२६००० मुंबई इलाख्यांत व २५००० बडोदें संस्थानांत आहे. मध्यहिंदुस्थान व राजपुताना यांतून १०, १५ हजार बोहरा आढळतात. व्यापारी बोहरा लोक शियापंथी व शेतकरी बोहरा सुनी पंथी आहेत. अकराव्या शतकांत इस्माइली पंथाच्या शिया मिशन-यांनीं हिदुस्थानांत येऊन पुष्कळ हिंदू बाटविले तेच हे बोहरा लोक होत कांहीं जण आपणास अरब ईजिप्शियन व अरब यामन वंशाचे म्हणवितात. शिया बोह-यांत ब-याचशा चालीरीती हिदूंप्रमाणें आहेत. बोहरा व्यापारी खोजांप्रमाणेंच फार श्रीमंत असतांत. यांची मुंबईस मोठी वस्ती आहे. बोहरा या नांवानें ओळखले जाणारे कांहीं हिंदूहि सावकार आहेत. त्यांची संख्या सुमारें चार हजार आहे. हे विशेषतः पंजाबांत आढळतात. हे गुजराथी भाषा बोलतात.