विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोस्टन– ही अमेरिकेंतील संयुक्त प्रांतांतील मॅसाचुसेट्सची राजधानी आहे. हें शहर मॅसाचुसेटसच्या आखातजवळ आहे. सध्यांचें बोस्टन शहर पूर्वींपेक्षां बरेंच वाढलें आहे. त्याचें क्षेत्रफळ आतां ४३ चौरस मैल आहे. समुद्र अडवून बरी जागा वाढविण्यांत आली आहे. लोकसंख्या (१९२०) ७४८०६० आहे.
शहरामध्यें प्रांक्लिन पार्क नांवाचा मोठा बगीचा आहे तो प्रेक्षणीय आहे. येथील बगीचे सर्व अमेरिकेंत फारच शोभिवंत असून त्यांची संख्या बरीच आहे. येथील कलाकौशल्याच्या संग्रहांत ब-याच जुन्या व प्रेक्षणीय वस्तू असून चार्लस सुमनरसारख्या मोठ्या लोकांचे पुतळे येथें आहेत. येथील सार्वजनिक वाचनलयांत ९ लाखांवर पुस्तकें आहेत. याशिवाय येथें दुसरीं वाचनालयें अनेक आहेत.
शि क्ष ण सं स्था– मॅसाचुसेटसचें कलाविद्यालय, बोस्टनचें विश्वविद्यालय हावर्ड विश्वविद्यालयाच्या कांहीं शाखा आणि याशिवाय चित्रकला व संगीत विद्यालयें येथें आहेत.
येथील बंदरांत बरींच जहाजें असतांत. पूर्व बोस्टनमध्यें व्यापारी पेठ आहे. बोस्टन हें अमेरिकेंतील आयातीचें दुस-या प्रतीचें बंदर आहे. सूत, गवत, लोंकर, चामडें, कापूस, साखर, लोखंड, पोलाद, लोखंडी वस्तू रासायनिक द्रव्यें कोळसा हे मुख्य निर्गतीचे जिन्नस आहेत. लोंकरीच्या व माशांच्या व्यापारांत लंडनशिवाय हेंच सर्वांत मोठें निर्गतीचें ठिकाण आहे. येथें साखर करण्याचे कारखाने, कपड्यांचे कारखाने, जोड्याचे कारखाने, त्याचप्रमाणें मिठाई, तंबाखू, पियानो, रबर व नौकांबंधनाचे कारखाने बरेच आहेत. रूग्णालयें व गरिबांकरितां अनेक वसतीगृहें आहेत.
येथील लोकांत आयरिश, कॅनेडियन, इंग्लिश, रशियन, इटालियन व जर्मन वगैरे लोकांची भेसळ आहे. म्हणून येथें निरनिराळ्या चालीरीती आढळतात. या ठिकाणीं प्युरिटन लोकांचें वर्चस्व असूनहि कॅथॉलिक चर्चें बरींच आहेत.