विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोरसिप्पा– (आधुनिक बिर्स अथवा बिर्सनिमरूद) हें एका प्राचीन शहराचें ग्रीक नांव आहे. हें शहर नहर हिंदिए अथवा हिंदिये कालव्यावर असून बाबिलोनच्या नैर्ऋतेस १५ मैलांवर होतें. या शहाराला दुसरें बाबिलोन म्हणत. येथील ग्रामदेवता नेबो अथवा नेबू होती. खमुरब्बीनें बाबिलोन राजधानी केल्यावर (इ. स. पूर्वीं २०००) बोरसिप्पा शहर उदयास आलें. या राजानें एझिदा देऊळ मारडुकच्या नांवानें बांधिलें. परंतु याच्या नंतरच्या राजांनीं नेबो देवाला मान दिला व त्याला ते मारडुकचा पुत्र म्हणत. याची मूर्ति दरवर्षीं मोठ्या समारंभानें बाविलोनला पित्याच्या भेटीस नेत असत. बबिलोनप्रमाणेंच शिकंदरानंतर बोरसिप्पाचा -हास झाला व मध्ययुगांत पूर्ण विध्वंस झाला. सध्यां या ठिकाणीं दोन टेंकाडें आहेत. त्यांपैकीं लहानास इब्राहिम खालील म्हणतात.