विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोनाई संस्थान– ओरिसा प्रांतांत हें मांडलिक संस्थान असून क्षेत्रफळ याचें १२९६ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस गंगपूर संस्थान व सिंगभुम जिल्हा; पूर्वेंस कंझार दक्षिणेस व पश्चिमेस बामरा संस्थान. लोकसंख्या (१९११) ५८०३९ उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी ब्राह्मणी नदी मुख्य असून तिला टेंकड्यांतून निघालेले कित्येक नाले मिळाले आहेत. जंगलांत वाघ, चित्ते, वगैरे कूर जनावरें व हरिणें असून क्वचित् हत्तीहि आढळतात. येथील जंगलांत साल, असाणा, शिसू व कुसम हीं मौल्यवान झाडें असून, लाख, टसर रेशीम, सर्व गवत हेहि वन्य पदार्थ आहेत. यापासून संस्थानास मुबलक उत्पन्न होत असतें. अगदीं थोड्या प्रमाणावर सोनें सांपडतें व लोखंडहि जरूरीपुरतें लोक काढितात. जाड कपडा, ठिसूळ दगडाचीं व पितळेचीं भांडी व दागिने बनविले जातात. येथें मुख्य पीक तांदुळाचें असून कापूस व गळिताचीं धान्येंहि पिकतात. प्रत्येक गांवाजवळ बहुधां आंबराई असतें.
येथें मूळच्या रानटी लोकांची वस्ती असून त्यांत भुइया, गोंड, हो, खरिया, भुड व पाण ह्या जाती मुख्य आहेत. या संस्थानांतून बंगाल- नागपूर रेल्वेचा फांटा गेला आहे.
हे संस्थान प्रथमतःस. १८०३ मध्यें रघूजी भोंसल्याकडून देवगांवच्या तहान्वयें इंग्रजांस मिळालें, ते पुनःस. १८०६ त परत भोंसल्याकडे गेलें; व पुन्हां १८१८ सालीं इंग्रजांकडे येऊन १८२६ सालीं त्यांच्या पूर्ण मालकीचें झालें. नंतर हें १८९९ सालीं येथील संस्थानिकास एका बंडाचा मोड केल्याबद्दल बक्षीस म्हणून मिळालें. १९०५ सालीं छोटा नागपूरकडून ओरिसाकडे गेल्यावरून १८९९ सालच्या सनदेंत थोडा फेरफार करण्यांत आला. संस्थानिक इंग्रजांस ठराविक खंडणी व विशेषप्रसंगीं लष्करी मदत देण्याबद्दल बांधले गेलें आहेत. त्यांनां ओरिसा येथील कमिशनरच्या सल्ल्यानेंच राज्यकारभार करण्याचा अधिकार आहे. ब-याच बाबतींत त्या कमिशनरची सल्ला घ्यावी लागते.