विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोगोटा- कोलंबियाच्या प्रजासत्ताक राज्याची राजधानी. येथील लोकसंख्या (१९१८) १४३९९४ आहे. एका मोठ्या डोंगरपठाराच्या पूर्वभागावर हें शहर असून समुद्रपाटीपासून याची उंची ८५६३ फूट आहे. बगीच्यांनीं सुशोभित केलेंले पुष्कळ चौक राखले आहेत. मुख्य सार्वजनिक इमारती व प्रार्थनामंदिरें या चौकासमोर आहेत. रास्ते सरळ व अरुंद परंतु स्वच्छ व चांगले फरसबंदीचे आहेत.
या शहराचें क्षेत्रफळ सुमारें ४ चौरस मैल आहे. येथें रस्त्यांतील गाड्या, विजेचे दिवे, टेलिफोन हीं आहेत. येथें एक विश्वविद्यालय तीन महाविद्यालयें, रसायनशास्त्र व खनिजशास्त्र यांची शाळा राष्ट्रीय अँकेडमी, लष्करी शाळा ५०००० ग्रंथाचें सार्वजनिक ग्रंथालय, राष्ट्रीय वेधशाळा, संग्रहालय व वनस्पति बाग आहेत. चांगलीं टाकसाळ देखील येथें आहे.
१५३८ सालीं गोंझॅलेझ किससेनेस केसाडा यानें हें शहर बसविलें १८११ सालीं येथील रहिवाशांनीं स्पॅनिश सत्तेविरूद्ध बंड करूंन स्वतःचें राज्य स्थापन केलें; परंतु १८१६ सालीं पॅब्लो मोरिलो नांवाच्या स्पॅनिश जनरलनें हें घेतलें होतें. १८१९ सालीं बोलिव्हारनें हें घेतलें. कोलंबियाच्या प्रजासत्ताकाची हें राजधानी बनलें. परंतु या प्रजासत्ताकाचे तीन विभाग झाल्यावर हें न्युव्हा ग्रॅनाडाची राजधानी झालें. कोलंबियाच्या घडामोडीच्या इतिहासांतील पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टी येथें घडल्या.