विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैतूल– मध्यप्रांतांतील एक जिल्हा. हा जिल्हा पहाडी आहे पण याच्यांत सर्व प्रकारचीं जमीन आहे. या जिह्यांत मुख्य नद्या तापी, वर्धा, बेल, मचना, सांपना व मोरन ह्या आहेत. बैतुलची हवा निरोगी आहे. पावसाची सरासरी ४६ इंच आहे. जंगली भागांत हींवतापाची साथ पावसाळ्यानंतर पुष्कळ दिवस राहते. या जिह्यात पुष्कळ ठिकाणी दगडी कोळसा सापडतों. तसेंच येथें जंगलहि विस्तीर्ण आहे. सागवान, साज, कोहया, शिरस, सरई मोहा या सर्व झाडांचा येथें भरपूर पुरवठा आहे. या ठिकाणीं सेसा किंवा तिरवाडीरीगवत ज्यापासून तेल निघतें तेंहि उत्पन्न होतें.
जिल्ह्याचा पूर्व कालीन इतिहास उपलब्ध नाहीं, खेरला, देवगड, मंडला आणि चांदा ह्या चार गोंडी राजांनीं या ठिकाणीं आपला अम्मल गाजविला असावा असें दिसतें. खेरला राज्यसंबंधानें कोणत्याच प्रकारचीं ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाहीं. केवळ फेरिस्तामध्यें कोठें कोठें याचें नांव आढळतें. १८ व्या शतकाच्या आरंभापासून थोडींशी ऐतिहासिक माहिती मिळू लागते. यावेळीं म्हणजे १७०३ सालच्या सुमारास गोंड राजा बखतबुलंद (मुसुलमान) देवगड येथें राज्य करीत होता. बखतबुलंद वारल्यानंतर चांद सुलतान हा गादीवर बसला. याला दोन मुलें होतीं. वडिलाचें नांव बुराणशहा व धाकट्याचें नांव अकबरशहा असें होतें. चांद सुलतान हा १७३९ सालीं मरण पावला. ह्या वेळीं त्याचीं दोन मुलें लहान असल्यामुळें वलीशहानें त्याचें राज्य बळकाविलें. वलिशहा हा चांदसुलतानाचा अनौरस मुलगा होता. त्या लहान मुलांच्या आईनें रघोजी भोंसल्याचें साहाय्य मागितलें. रघोजी भोंसले यावेळीं व-हाडांत राज्य करीत होता. भोंसल्यानें सैन्यासह येऊन वलीशहास मारून मुलांनां सोडवून गादीवर बसविलें आणि मुलांजवळून राज्याची अर्धी जमाबंदी देण्याबद्दल कबुली घेऊन तो व-हाडकडे परत गेला. देवगड राज्यापैकीं अर्धीं जमाबंदी भोंसल्यानां १७४२ सालापर्यंत कराराप्रमाणें मिळत राहिली. १७४३ सालीं बुराणशहा व अकबराशहा यांमध्यें तंटा उपस्थित झाला. यामुळें गोंड लोकांनीं राज्यांत दंगे सुरू करूंन एक वर्षपर्यंत लुटमार केली. बुराणशहाच्या विनंतीवरून पुनः रघोजी भोंसले येऊन व त्यानें बुरणशहाला मदत करूंन अकबर शहाला हांकून लावले. थोड्या दिवसांनतर रघोजीनें बुराणशहाला नागपुरास नेलें. घाटावरील प्रदेश जरी नाममात्र गोंड राजाच्या ताब्यांत कांहीं दिवस होता तथपि पूर्वेकडील भाग वास्तविक भोंसल्याच्या राज्यांत सामील झाला होता. आपासाहेबाचा मोड होऊन तो पळाल्यानंतर १८१८ सालीं इंग्रजांनां फौजेच्या खर्चाबद्दल जो मुलुख तोडून दिला त्यांतच हा बैतुल जिल्हा आला आणि १८२६ सालीं जो तह झाला त्याप्रमाणे हा जिल्हा ब्रिटिश राज्यांत सामिल झाला. या जिह्यांत कुणबी लोकांची संख्या जास्त आहे. त्यांच्यांत मराठा कुणबी व परदेशी कुणबी, ढोलबार अशा जाती आहेत. कोर्कू लोक हे सावलीगड परगण्याच्या कांहीं तालुक्यांतच आढळतात.
ह्या जिह्यांत मुख्य पैदास ज्वारी, गहूं, कडधान्यें यांची आहे. कापूस, जोंधळा, धान, कुटकी कोदु्र हींहि या ठिकाणीं होतात. बैतूलमध्यें ऊंस चांगला होतो. अफूची लागवड मुलताई परगण्यामध्यें होत होती. या ठिकाणीं पहाण्यायोग्य असा खेर्ल्याचा किल्ला आहे. मुलताईमध्यें अनेक देवालयें जुनीं व त-हेत-हेच्या आकारांचीं आकारांचीं तापी कुडाच्या सभोंवतीं दृष्टीस पडतात. पण त्यांत सुंदर देवालय एकहि नाहीं. मुक्तागिरी या ठिकाणींहि धबधब्याजवळ बांधलीं असल्यामुळें हें स्थान रम्य दिसतें. पडके किल्ले बौरगड, ज्यामगड, सौलीगड व जेतपूर या ठिकाणींहि दिसतात. विवेकसिंधूचा कर्ता मुकुंदराव स्वामी हा इ. स. १३०० च्या सुमारास होऊन गेला. त्याच्या ग्रंथात खेरला राजांच्या संबंधानें थोडीं बहुत माहिती मिळतें. या स्वामीची समाधि अजून खेरला किल्ल्यांत दृष्टीस पडते. हल्लीं या जिल्हयाचें क्षेत्रफळ ३८७२ चौरस मैल आहे. व येथील लोकसंख्या (१९२१) ३६३७३७ आहे.
त ह सी ल.- मध्यप्रांत, बैतुल जिल्ह्यांतील ही एक पश्चिमेकडील तहशील आहे. क्षेत्रफळ १८०२ चौरस मैल. लोकवस्ती (१९११) १५०४९३. तहसीलींत बदनूर व बैतूल अशीं दोन गांवें व ४८१ खेडीं आहेत. पैकीं बदनूर हें जिल्हा व तहशिलीचें मुख्य ठिकाण (लोकसंख्या सुमारें ५ हजार) आहे.