विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैजनाथ– पंजाब, प्रांतांत, कांग्रा जिल्ह्यामधील एक खेडें गांव. याचें प्राचीन नांव कीरग्राम असें होतें. हें पालनपूरच्या पूर्वेस ११ मैलांवर आहे. लोकसंख्या (१९०१) ६५५५. येथील दोन देवळांवर, प्राचीन शारदालिपींत लिहिलेले लेख आहेत; त्यांमध्यें जालंधर किंवा त्रिगर्त यांचे नातेवाईक जे कीरग्रामचे राजे त्याची वंशावळ दिलेली आहे. हीं देवालयें तेराव्या किंवा चवदाव्या शतकांत बांधलेलीं असावींत.
(२) हें खेंडें, संयुक्तप्रांतात, जिल्हा व तालुका अल्मोरा यामध्यें आहे. याचें प्राचीन नांव कातिकेयपूर असें असून तेथें कत्यूरी राजांची राजधानी होती. खो-यांतील देवळांमध्यें ताम्रपट सापडलेले आहेत. हल्लीं तेथें कित्येक चहाचे मळे आहेत.