विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बैकल– पूर्व सैबेरियामधील सरोवर. जगांतील सर्व सरोवरांत या सरोवराचा सहावा नंबर लागतो. बैकल हें यूरेशियामधील सरोवरांमध्यें सर्वांत मोठें गोडें सरोवर आहे. याची लांबी ३८६ मैल व रूंदी २० ते ५० मैल आहे. इर्कुटस्क व ट्रॅन्सबैकालिया हीं दोन राज्यें यानें विभक्त केलेंलीं आहेत. हें सरोवर सुमारें १५०० फूट उंचीवर असून याचें क्षेत्रफळ १३२०० चौरस मैल आहे.
ओखोन बेट व स्व्याटोइनास द्वीपकल्प यांनीं या सरोवराचें दोन भाग झालेंले आहेत. या सरोवराचा आग्रेय भाग सर्वांत खोल आहे. सरोवराच्या बहुतेक भागाची खोली २४०० फूट आहे.
बैकल सरोवराला सुमारें ३०० प्रवाह येऊन मिळतात; याशिवाय या सरोवराच्या ईशान्येस अगारा, पूर्वेस बार्गुझीन व आग्रेयीस सेलेंगा, या नद्या मिळालेल्या आहेत. इरकुत नदी पूर्वीं या सरोवरास मिळत होती परंतु आता ती सरोवराच्या उत्तरेस गेली आहे.
पूर्वीं या सरोवराचा विस्तार फार मोठा होता. याच्या किना-यावरील प्रांतांवर ज्वालामुखीपर्वताचे स्फोट पूर्वींपासून होत आलेले आहेत. या सरोवरांत वादळें फार होत असल्यामुळें व चांगलीं बंदरें व उपसागर नसल्यामुळें यांतून नलबतानें व्यापार करणें फार कठिण जातें.