विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेळगांव जिल्हा.– मुंबई इलाख्यांत दक्षिणभागांतील एक जिल्हा, याचें क्षेत्रफळ ६४९ चौरस मैल. असून उ .अ. १५० २२’ ते १६० ५८’ आणि पूर्व रे ७४० २’ व ७५० २५’ यांमध्यें आहे. हा प्रदेश सपाटीचा असून त्यांत कांहीं ठिकाणीं लहान लहान पर्वतांच्या ओळी व उंच शिखरें आहेत. मुख्य नद्या कृष्णा , घटप्रभा आणि मलप्रभा या होत काळवीट, सांबर, हरीण, रानडुकरें आणि तरस जंगलांत पुष्कळ फिरतात. चित्ते चोहोंकडे आहेत, परंतु वाघ दक्षिणेस व नैर्ॠत्येस दृष्टीस पडतात. हवा समशीतोष्ण आणि आरोग्यकारक असतें. जानेवारींत अगदीं कमी उष्णता (५.३०) असतें व मे मध्यें १००० पर्यंत असतें. सरासरी ५० इंच पाऊस मुख्य ठाण्याच्या ठिकाणीं पडतो.
इतिहास– बेळगांव जिल्ह्यांतील अगदीं जुनें गांव हळसी हें होंय; हें शहर कादंब घराण्याची राजधानी होती व एकंदर त्या घराण्याचे ९ राजे झालें. बहुतकरूंन बेळगांव प्रथम ५५० पासून ७६० पर्यंत चालुक्यांच्या ताब्यांत असावें; त्यानंतर राष्ट्रकूटांच्या ताब्यांत जाऊन १२५० पर्यंत रट्ट (८५७ -१२५०) मंडलेश्वर सत्तेखालीं होतें, त्यांची राजधानी सौंदत्ती व नंतर (१२५०) वेणुग्राम (हल्लींचें बेळगांव) होतें. जिल्ह्यामध्यें जे खोदीव लेख दृष्टीस पडतात त्यांवरून असें दिसतें कीं, बाराव्या व तेराव्या शतकाच्या आरंभीं गोवें येथील कादंबांच्या ताब्यांत (९८७ – १२५०) हलसीद्वादशसहस्त्री व वेणूग्राम अथवा बेळगांव 'सत्तरी' होतें १२०८ सालीं तो प्रदेश रट्टांनीं घेतला; रट्टांचा शेवटचा राजा दुसरा सिंघण याचा दिवाण व सेनापति विचन यानें पाडाव केला. त्या वेळेपासून १३२० पर्यंत बेळगांव व आसपासचा प्रदेश यादवांच्या ताब्यांत होता.
याचा दक्षिणेकडील भाग विजयानगरच्या ताब्यांत होता. १३४७ सालीं बहामनी राज्य स्थापन झाल्यावर तेथील राजांनीं उत्तरेकडील दिल्लीच्या राजाच्या ताब्यांतला प्रदेश घेतला. व नंतर १४७३ सालीं बेळगांव घेऊन दक्षिण भागहि घेतला. पुढें विजयानगरच्या राजांनीं पुन्हां तो प्रदेश घेण्याचा प्रयत्न केला, परंतु १५६५ सालीं त्यांचा पुरा पाडाव झाला पुढें १२० वर्षपर्यंत बेळगांव विजापूरच्या सुलतानांच्या प्रदेशांतील भाग होता असें म्हणतां येईल. १६८६ सालीं औरंगझेबानें विजापूरचा पाडाव केल्यानंतर, तो जिल्हा मोगलांच्या ताब्यांत गेला, व त्यांनीं तो सावनूरच्या नबाबाला जहागीर म्हणून दिला व शेवटीं त्याचा कांहीं भाग नबावाला निजामास देणें भाग पाडलें. त्यांपैकीं कांहीं प्रदेश मराठ्यांच्या हातांत होता असें दिसतें. १७७६ सालीं हैदरअल्लीनें तो प्रदेश पादाक्रांत केला, पुढें पेशव्यांनीं तो इंग्रजांच्या साहाय्यानें घेतला; परंतु कोल्हापूर, निपाणी व इतर ठिकाणच्या संस्थानिकांच्या व शिद्यांच्या सैन्यांनीं वारंवार येऊन तो जिल्हा लुटला व अशा धामधुमींत १८१८ सालीं तो प्रदेश इंग्रजांच्या ताब्यांत गेला व तो घारवाड जिल्ह्यांचा भाग करण्यांत आला. परंतु पुन्हां जिल्हा मोठा झाल्याकारणानें बेळगांव हा स्वतत्र जिल्हा करण्यांत आला.
हळसी येथें कांहीं ताम्रपत्रें सापंडलीं आहेत. कांहीं ठिकाणचीं देवळें जखनाचार्यानीं बांधलीं आहेत असें म्हणतात, परंतु तीं खरीं चालुक्यांचीं आहेत, सर्वांत उत्तम असें देऊळ देगांव येथें आहे. कोन्नूर येथें फार प्राचीन स्मशानभूमि आहे. बेळगांव जिल्ह्यांत पुष्कळ ठिकाणीं चांगलीं व प्रसिद्ध देवळें आहेत.
लोकसंख्या (१९२१) ९९३९७६ आहे. सर्व प्रकारचें, धान्य सर्व ठिकाणच्या जमीनींतून होतें; कापूस मात्र काळ्या जमिनींतच येतो. ज्वारी हे मुख्य धान्य आहे; जिल्ह्यांत कापूस पुष्कळ होतो; तो एकंदर ३५२ चौरस मैलांत पेरला जातो; याचीं मुख्य ठिकाणें अथणी, पारसगड व गोकाक जिल्ह्याच्या पश्चिम घाटांत जंगलें फार आहेत. कोल्हापूराकडे गारगोट्यांत कधीं कधीं हिरे सांपडतात असें म्हणतात; त्याचप्रमाणें मलप्रभेच्या कांठच्या प्रदेशांत सोनें सांपडतें. बेळगांव, गोकाक संपगांव व रामपारूजवळ लोखंड गाळतात.
शेतकीशिवाय हातमागावर कापड विणणें हाहि या जिल्ह्यांतील मुख्य धंदा आहे, व गोकाक शहर रंगविणारांकरितां प्रसिद्ध आहे, शिवाय येथें मातींची व लांकडचीं खेळणीं तयार होतात. या जिल्ह्यांतून सदर्न -मराठा रेल्वे जाते. एकंदर लोकसंख्येपैकीं शेंकडा ५ लोकांस लिहितांवाचतां येतें.
ता लु का,- याचें क्षेत्रफळ ६४४ चौरस मैल आहे. यांत एक शहर (बेळगांव) व १९८ खेडीं आहेत. सन १९११ सालीं लोकसंख्या १३६८७७ होती. वार्षिक पावसाचें मान ५२ इंच असतें.
शहर.- हें सदर्न - मराठा रेल्वेवर असून समुद्रपाटीवर १५०० फूट आहे. १९११ सालीं लोकसंख्या ४२६२३ होती. तीपैकीं क्यांटोनमेटांत १११७२ व सबर्बमध्यें १८१५. १८५१ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झालीं; क्यांटोनमेंट शहरच्या पश्चिम हद्दीपलीकडे आहे. या ठिकाणीं वेळू पुष्कळ होतात; यावरूनच याचें प्राचीन नांव 'वेळुग्राम' पडलें असावें असें म्हणतात. आंब्यांची, वडाचीं व चिंचांचीं झाडें पुष्कळ आहेत. बेळगांव शहर इंग्रजांच्या ताब्यांत गेल्यापासून पुष्कळ वाढलें आहे व लोकहि धनाढ्य झालें आहेत. १८३८ सालापासून हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. व्यापाराचे मुख्य जिन्नस मीठ, वाळलेले मासे, खजूर, नारळ, नारळाची च-हाटें; हे सर्व समुद्रकिना-यावरून मुख्यतः बेंगुर्ला बंदरावरून येतात. धान्य, साखर वगैरे आसपासच्या भागांतून येतात. शहरात हातमाग बरेच आहेत. दोन हायस्कुलें असून म्युनिसिपालिटीच्या मुलांच्या व मुलींच्या शाळा आहेत. यूरोपियन व यूरेशियन मुलांमुलींकरितांहि शाळा आहेत. दक्षिणभागाच्या कमिशनरचें राहण्याचें हें ठिकाण आहे. मामुली सर्व मुलकी व न्यायखात्यांच्या कचे-या असून एक क्यांटोन्मेट मॅजिस्ट्रटचें कोर्ट, सबऑर्डिनेट जज्जाचं कोर्ट, एक सिव्हिल इस्पितळ व रेल्वे दवाखाना हीं आहेत.