विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेहडा– हिंदुस्थान, ब्रम्हदेश, व सिलोन या भांगामध्यें ३००० फुटांखालच्या जंगलांत हें झाड आढळतें; सिंध व राजपुताना या रूक्ष भागांत मात्र आढळत नाहीं. याचीं पानें दरवर्षीं गळतात. या झाडाला डिंक पुष्कळ येतो. परंतु तो पाण्यांत विरघळत नाहीं. हलक्या प्रतीच्या रंगाकरितां व कातडीं कमाविण्याकरितां याच्या फळांचा उपयोग करतात; व त्यांची निर्गतहि बरींच होतें. याचा मगज खातात; परंतु फार खाल्लास गुंगी येते. याच्या फळाची साल औषधी आहे.