विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेस्ता- एक तेलगू जात. यांची एकंदर लोकसंख्या सुमारें दोन लाख आहे. पैकीं म्हैसूर संस्थांनांतरच १|| लाख आहेत. यांनां पूर्वेकडे बेस्ता (कोळी), दक्षिणेकडे तोरय, अंबिग, परिवर व पश्चिमेकडे कब्याट व गंगे मक्कळु म्हणतात. यांचे मुख्य धंदे मासे मारणें, चुनखडी भाजणें, पालखी वाहणें व शेती करणें हे होत. पण आजकाल बहुतेक लोक शेती अगर मजूरी करतात. स्त्रिया अविवाहित राहूं शकतात. ‘बसवीची’ चाल जरी अस्तित्वांत असली तरी आजकाल ती लोकांस आवडेनाशी झालीं आहे. बालविवाह व त्याचप्रमाणें प्रौढविवाह या जातींत रूढ आहे. स्त्री व्यभिचारी निघाल्यास घटस्फोट करण्याची परवानगी आहे. या जातींत शैव व वैष्णव असें दोन्ही पंथांचे लोक आहेत. यांच्या भिक्षुकांतहि दोन भेद आहेत; पहिला शैव जोगी व दुसरा वैष्णव दासरी हा होय. ( खे. रि.(म्हैसूर) १९११)