विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलग्रेड- (बायोग्रेड किंवा बेयोग्रेड, म्हणजे 'श्वेतदुर्ग' ही सर्व्हियाची राजधानी आहे. लोकसंख्या (१९२१) १११७४० पूर्वीं या शहराचें जुनें शहर, रशियन शहर व तुर्की शहर, असें तीन भाग होतें. परंतु राजाचें वसतिस्थान, राजधानी व आयात व्यापाराचें केंद्र असल्यामुळें १८६९ नंतर बेलग्रेडला आधुनिक यूरोपियन शहराचें स्वरूप लवकरच प्राप्त झालें. सर्व्हियाचा परदेशांशीं बहुतेक व्यापार बेलग्रेड मधूनच होतो. परंतु येथें मजुरांचा व भांडवलाचा तुटवडा असल्यामुळें या शहरांतील उद्योगधंद्यांची निपज फार थोडीं आहे. येथें दारू गाळणें, लोंखड ओतणें, कापड, बूट, कांतडें, कमविणें, सिगारेट, आगपेट्या, मातीचीं भांडीं, जोगवलेले मांस व मिठाई वगैरे तयार करणें हे मुख्य उद्योगधंदे आहेत. येथें १८३८ सालीं स्थापन झालेंलें एक विश्वविद्यालय आहे.
बेलग्रेडचें ७ व्या शतकापावेतों सिंजिदनम असें नांव होतें व रोमन लोकांचा तेथें अंमल होता. ८ व्या शतकांत फ्रेंच, ९ व्या शतकांत बल्गेरियन, ११व्या शतकांत ग्रीक, पुढें हंगेरियन, १६ व्या शतकांत तुर्क, १७व्या शतकांत ऑस्ट्रियन, नंतर पुन्हां तुर्क याप्रमाणें अनेकांची सत्ता या शहरावर होती.