विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेरी- मध्यहिदुस्थानांत बुदेलखंड एजन्सींतील एक लहानसें सनदी संस्थान. क्षेत्रफळ सरासरी ३२ चौरस मैल लोकसंख्या सुमारें चार हजार. येथील जहागीरदार बुंदेले पोवार आहेत. येथील जहागिरदारांनां राव ही पदवी आहे. संस्थानांत ६ खेंडीं असून उत्पन्न २१ हजार रूपये आहे. बेरी हें मुख्य ठिकाण असून वटवा तें नदीच्या उत्तरतीरावर वसलें आहे.
बेरी– हा उष्णकटिबंधाच्या आसपास असणा-या देशांत आढळमारा रोग पुरातन कालापासून तेथील लोकांस माहित आहे. हिदुस्थान देशांतहि हा रोग बहुतकरूंन परदेशी जाणारे येणारे एतद्देशीय खलाशी, मजूर, व्यापारी यांमध्यें आढळतो. हा विशेष प्रचलित असण्याचें स्थान विषुववृत्तावर ४५० व त्याच्या खालीं (दक्षिणेकडे) ३५० इतक्या टापूंत असतें.
म्यानसन वगैरे शोधकांच्या मतें या रोगाचें विशिष्ट जतू हें कारण होय. पण इतर रोगाचे जंतू जसे प्रत्यक्ष सांपडून सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पहातां येतात तसे हे जंतू वेगळे काढून दाखवितां येणें अद्याप साध्य झालें नाहीं, परंतु हा एका गांवापासून दुस-या गावांत आपोआप पसरणारा रोग आहे. रोग विशेष फैलावण्यास अनुकूल परिस्थिति म्हणजे सर्द हवा, उष्ण हवामान. कोंदट व खिडक्यादारें कमी असलेल्या इमारती, फाजील वस्तींचीं ठिकाणें व अर्धपोट गरीब लोकांची वस्ती वाईट अन्न सेवनानेंहि हा रोग बळावतो. जे मुख्यतः भात खाऊ लोक आहेत व ज्यांस अति पांढरा सडून स्वच्छ केलेंला तांदूळ ( ज्यास बाजारांत पॉलिशड् राइस म्हणतात) हवा असतो त्या लोकांमध्यें हा रोग फार होतो. सडून स्वच्छ करण्याचा क्रियेंत भूस कोंडा निघून जाऊन कोड्यांत व्हायटॅमिन नांवाचें सत्त्व असतें तेंहि पण निघून जातें व त्यांत हा रोगप्रतिबंधक गुण आहे .त्याचे इतर गुणधर्म अद्याप कळले नाहींत. पण हें सत्त्व भात शिजवल्यानें नाहींसें होत नाहीं. गिरणींतील रव्यापासून ज्या पोळ्या अथवा रोट करतात त्यांतहि हे द्रव्य, गव्हावरील सालें, कोंडा घासून निघून गेल्यामुळें जरी दिसण्यांत शुभ्र दिसलें तरी, मुळींच नसतें. पण त्यापासून रोग होत नाहीं. कारण गहूं खाणारे लोक नुसताच गहूं खात नाहींत पण भातखाऊ लोक मात्र सर्वस्वीं भातावरच निर्वाह करतात.
१५-४० वर्षें या वयांत हा रोग विशेषतः होतो. व यावरील किंवा खालील वयाच्या माणसांस तो बहुतेक होत नाहीं. स्त्रियांपेक्षां पुरूषांस विशेष होतो. सर्व जानीस हा रोग झाला म्हणजे तो पुन्हां होण्याचा संभव बराच असतो.
ल क्ष णें- यासारखा दुसरा होणारा रोग पेरिफेरल न्युरिटिस हा आहे. पण त्याची सांथ नसते. व त्या रोगांत जे दुरचे मज्जातंतू बिघडतात ते बिघडून शिवाय फ्रेनिक आणि न्युमोगॅस्ट्रिक हे अति महत्त्वाचे मज्जातंतूहि विकृत होतात.
पूर्वचिन्हावस्था– रोग्यास अशक्तपणा व आळस येऊं लागून थोडें श्रम केलें असतां त्यास लवकर दम लागतो. मन उदाप्त होतें; हातपाय तापल्यासारखें व बधिर झाल्यासारखे वाटूं लागून पायांतून व पोट-यांतून वाब अगर गोळे येतात. घोटे व तोंडावर सूज येते द्वितीयावस्था सुरू झालीं म्हणजे रोग्याची एकदम पायांतील शक्ति नाहींशी होतें व त्याच्यानें चालवत नाहीं किंवा उभें रहावत नाहीं. त्वचेचें स्पर्शज्ञानाहि अंमळ विकृत होतें, पावलें, पाय व हातांत आग होऊन शिणका निघूं लागतात. बोटांचीं अग्रें अति गारठतात व पोट-या जरा दाबल्या किंवा हातांत धरल्या तरी तो दाब सहन होत नाहीं. पूर्वींची सूज सर्वांगावर पसरते. हातापायांतील अशक्तपणा वाढून अर्धांगाप्रमाणें ते बरेच लुले होतात. मधुन मधून कारणाशिवाय दम लागतो व छाती धडधडून जलद उडूं लागते. लववी कमी होऊं लागते. ताप बहुधां नसतो. या स्थितींत रोगी कित्येक दिवस अगर आठवडे पडून असतो. आणि नंतर तृतीयावस्थेस आरंभ होऊन रोग्यास उतार पडत जातो. सूज नाहींशी झाल्यावर पोटरीचे व पायाचे स्नायू अगदींच रोडावतात. पुढें पूर्ववत प्रकृति होतें खरी पण फार दिवस म्हणजे कांहीं महिने अगर एक वर्षहि लागतें. सुधारणा होण्यास आरंभ मात्र नीट झाला पाहिजे. कांहीं रोग्यांनां उतार न पडतां लक्षणें जास्त होऊन ह्दयक्रिया बंद पडते व मृत्यु येतो. यांतील मृत्युसंख्येचें प्रमाण रोगाच्या तीव्रतेच्या मानानें शेंकडा २-५० हि असतें. मलायी लोक मात्र या रोगांत फारच दगावतात.
जे रोगी बरे होतात त्यास व्हायट्यामिन सत्त्व असलेले खालील पदार्थ आवडीप्रमाणें व जातिधर्माप्रमाणें द्यावेत:- कच्ची अगर भाजलेली यीस्ट २ औसपर्यंत किंवा त्याच्या केलेंल्या पोळ्या अगर रोट अगर दूधसाखरेंत ती मळून नाना त-हेचे पदार्थ करावेत; वाटाण्याचें सार; कच्चीं अंडीं; खाद्यपशूंचे मेंदू, यकृत, मूत्रपिंड ह्दयस्नायु; साध्या कणकेचे पाव, वाटाणे, डाळी वगैरे द्विदल धान्यें; दूध, मासे, मांस, भाकरी, बिस्किटें, यांबरोबरच ताज्या भाज्या, फळफळावळ व लिंबाचा रस देंणे हेंहि पचनास फायदेशीर आहे. स्नायूंची शाक्ति व पचनशक्ती वाढण्याकरिता कुचला, अगर स्ट्रिकनिया व लोहमिश्रित औषधें द्यावींत.