विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेन्थाम, जर्मी ( १७४८ – १८३२)– एक इंग्रज तत्त्ववेत्ता व कायदेपंडित जर्मीनें वयाच्या तिस-या वर्षापासूनच इतिहासवाचन व लॅटिन भाषेच्या अभ्यासास सुरवात केली. लवकरच तो ग्रीक व लॅटिनमध्यें कविता करूं लागला. वयाच्या तेराव्या वर्षीं मॅट्रिक व १७६३ सालीं बी. ए. झाला व नंतर त्यानें कायद्याचा अभ्यास केला. परंतु वकिली धंद्याऐवजीं रसायनशास्त्रप्रयोग व न्यायपद्धतींतील दोषविवेचन यांतच बेन्थामवा वेळ जाऊं लागला. पुढें १७७५६ सालीं ‘राज्यपद्धतीवरील निबंध’ प्रसिद्ध झाला. त्यांत ब्लॅकस्टननें इंग्लंडच्या राज्यपद्धतीच्या केलेंल्या स्तुतीवर मार्मिक टीका होती.
त्याचा कायदेरचनाशास्त्राच्या तत्त्वांचा अभ्यास चालूच होता. बरींच वर्षें श्रम करूंन १७८९ मध्यें त्यानें आपला 'नीति व कायदे यांचीं तत्त्वें’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. कायद्याचा अभ्यास सुरू केल्यावर त्याला न्यायपद्धतींतील अनेक ढोवळ दोष दिसूं लागलें. म्हणून कायदेशास्त्र व नीतिशास्त्र भक्कम पायावर उबारण्याकरितां 'बहुतमांचें बहुतसुख (ग्रेटेस्ट हॅपिनेस ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर, हें तत्त्व त्यानें स्वीकारिलें. नीतिशास्त्रांतील उपयुक्ततावादाचें हेंच आद्यसूत्र होय.
नीतिशास्त्रपेक्षां कायदेशास्त्रावर बेन्थामचा भर अधिक होता. वरील तत्त्वानुसार प्रत्येक प्रचलित कायदा उपयुक्त आहे कीं नाहीं, असें परीक्षण त्यानें सुरू केलें. या त्याच्या कामगिरीमुळें इंग्लंडांतील फौजदारी कायद्यांत व दिवाणी आणि फौजदारा प्रोसीजरमध्यें हितावह फरक करण्यांत आले. बेन्थामचीं तत्त्वें जगांतील सर्व कायदेशास्त्रज्ञांनां मार्गदशक होणारीं आहेत; कारण नीतिशास्त्र व राजनीतिशास्त्र या दोहोंतहि योग्य विचारपद्धति त्यानें घालून दिली आहे.