विभाग आठरावा : बडोदें ते मूर  

बेन, अलेक्झांडर (१८१८-१९०३)-
एक स्कॉटिश तत्त्ववेत्ता व शिक्षणशास्त्रज्ञ. कॉलेजचें शिक्षण घेऊन ग्लासगो युनिव्हर्सिटींत तो सृष्टीशास्त्र व गणित या विषयांचा प्रोफेसर झाला. लंडनमध्यें आरोग्याच्या बोर्डांत त्याला जागा मिळून तो १८४८ सालीं तेथें राहण्यास गेला; १८५५ सालीं इंद्रियें आणि बुद्धि आणि १८५९ सालीं विकार आणि इच्छा हे त्याचे ग्रंथ प्रसिद्ध झालें. लंडन युनिव्हर्सिटींत तर्कशास्त्र व नीतिशास्त्र यांचा व इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील नीतिशास्त्र या विषयाचा तो दहाबारा वर्षें परीक्षक होता.

१८६० सालापासून आबर्डीन युनिव्हरर्सिटींत  इंग्रजी भाषा व तर्कशास्त्र या विषयांचा तो वीस वर्षें प्राफेसर होता. त्या अवधीत त्यानें विद्यार्थ्याकरतां व्याकरण, वक्तृत्व, स्वाभाव विज्ञान, मानस व नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, मस्तकसामुद्रिक, इत्यादि विषयांचीं क्रमिक पुस्तकें तयार केलीं; व या कामगिरीबद्दल एडिनबरो युनिव्हर्सिटीने त्याला डॉक्टरची पदवी दिली. १८७६ सालापासून त्यानें 'मानस' याअर्थी नांवाचें मासिकहि चालविलें होतें.