विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेदर, जि ल्हा.- निझामच्या राज्यांत गुलबर्गा विभागांत हा एक जिल्हा आहे. क्षेत्रफळ ४१६८ चौरस मैल. यांतील प्रदेश बहुतेक सपाट आहे. मांजरा ही या जिल्ह्यांतील मुख्य नदी होय. या जिल्ह्यांतील हवा निरोगी आहे.
इतिहास:- महंमद तुघ्लखाच्या काळापासून याचा इतिहास उपलब्ध आहे. १३४७ सालीं गुलबर्ग्याच्या पहिल्या ब्राम्हणी राजानें बेदर घेतलें १४३० सालीं अहमदशहा वली बहामनी यानें येथील किल्ला बांधून, बेदरगांत वसविलें. बहामनी राज्याचा नाश झाल्यावर, हा भाग बेदरच्या बरीदशाही कडे होता (१४९२-१६०९). पुढे हा जिल्हा विजापूरकरांकडे होता. १६२४ सालीं हें शहर निजामशाहीच्या मलिकंबरानें लुटलें. याचा कांहीं भाग विजापूरकरांकडे १६५६ पर्यंत होता. निजामचें राज्य स्थापन झाल्यावर १८ व्या शतकाच्या आरंभीं ह्या मुलुखाचा त्या राज्यांत समावेश झाला.
या जिल्ह्यांत प्राचीन काळच्या वैभवाची साक्ष पटविण्या-या पुष्कळ इमारती व लेणीं आहेत. बेदरचा किल्ला अजून चांगल्या स्थितींत आहे. या किल्ल्यावर पुष्कळ तोफा आहेत. कल्याणी येथें पुष्कळ प्राचीन काळच्या इमारतींचे अवशेष दृष्टीस पडतात. कल्याणी ही चालुक्य राजांची राजधानी होय. या खेरीज निलंग, करूंन, नारायणपूर, साकोल सिरूरी, सीतपूर, व तिपरथ या खेडेगांवीं जुन्या इमारतींचे अवशेष आहेत.
लोकसंख्या (१९११) ८८९५२७ या जिल्ह्यांतील जमीन फार सुपीक आहे. गेरू व संगजिरे हे खनिज पदार्थ येथें सांपडतात. येथें एक विशेष प्रकारचे दगड सांपडतात. त्यांचा घरें बांधण्याच्या कामीं उपयोग होतो. बेदरचीं भांडी फार प्रसिद्ध आहेत; यांवर पूर्वीं नक्षीकाम फार उत्तम करीत असत. भांडीं करण्याच्या धातूंत तांबें, शिसें, जस्त, कथिल हे धातू असत. पूर्वीं येथें जाडेभरडें कापड, साड्या तयार होत. तें काम अलीकडे बंद पडत चाललें आहे. येथें कांबळीं तयार होतात. निर्गत माल जोंधळा वगैरे धान्यें, कापूस, गळिताची धान्यें, मेंढरें, तंबाखू गूळ, वगैरे असून माल लोखंडी भांडीं, मीठ, खारावलेले मासे, अफू, रूपें, सोनें, तांबें, पितळ, साखर, लोखंड, राकेल, रेशीम हा आहे. व्यापाराचें मुख्य गांव बेदर होय. बेदर जिल्ह्यामधून आगगाडीचा फांटा गेलेंला नाहीं. या जिल्ह्यांत साक्षरतेचें प्रमाण १.९ आहे.
ता लु का.- क्षेत्रफळ ६२० चौरस मैल व लोकसंख्या (१९११) १२०४६१. मुख्य गांवें बेदर व कोहीर. खेडीं १७१ पैकीं ८९ जहागिरी आहेत. या तालुक्यांतून मांजरा नदी गेली आहे.
गां व.- बेदर जिल्ह्याचें मुख्य गांव असून लोकसंख्या (१९११) १२६८४ वरंगळच्या काकतीय राजानें महादेवाचें देऊळ बांधिलें व त्याभोंवतीं १३ व्या शतकांत वस्ती होण्यास सुरूवात झालीं. १३२१ सालीं महंमद तुघ्लखानें हें घेतलें. १३४७ सालीं हें बहामनी राज्यांत मोडूं लागलें. अहमदशहावलीनें किल्ला बांधून सध्याचें शहर वसविलें. व १४३० सालीं बहामनी राज्याची राजधानी येथें नेली. १४९२ सालीं बेरोदशाही स्थापन झालीं १६२४ सालीं मलिकंबरानें हें शहर लुटलें. १६५६ सालीं अवरंगझेबानें बेदर घेतलें. पुढें निझामानें आपलें स्वातंत्र्य जाहीर करूंन बेदर आपल्या राज्यास जोडलें. येथील इमारती या गांवच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतात. महंमद गवान यानें येथें एक मोठी मद्रेसा बांधली. तिचें अवशेष सध्या दृष्टीस पडतात. येथील किल्ल्यावर जुन्या तोफा आहेत. येथें अलीबरीद, काशीमबरीद या राजे लोकांचीं थडगीं आहेत.