विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेझोर- खरा बेझोर हा दगड कांहीं प्राण्यांच्या शरीरांत, विशेषतः इराणी रानबक-याच्या शरीरांत सांपडतो. बेझोर हा शब्द मूळ 'बझहर' या शब्दावरून प्रथम इंग्रजींत व इंग्रजींतून मराठींत आला आहे. बकरा, उंट, मासा अथवा साप यांपैकीं ज्याच्या शरीरांत सांपडला असेंल त्याप्रमाणें बेझोर हा खडा निरनिराळ्या प्रकारचा असतो. सर्पाच्या शरीरांत सांपडलेल्या खड्याला सर्पमणि म्हणतात. हाडांपासून कृत्रिम बेझोरहि तयार होत असल्याचें कांहीं लेखकांनीं लिहिलें आहे. दींव व गोवळकोंडें हीं ठिकाणें बेझोर करितां प्रसिद्ध आहेत. खरा पौरस्य बेझोर अंडाकृति व अक्रोडापेक्षां लहान असतो. त्याचें बाह्यांग गुळगुळीत व चकचकीत असून तो पुष्कळ थरांचा बनलेला असतो. ऑलिव्ह सारखा हिरवा रंग सर्वांत उत्तम समजतात. त्याला चव नसते, परंतु विशिष्ट प्रकारचा वास असतो. तो चाकूने सहज कापला जातो; व जिभेवर अथवा दुस-या ओलसर जागीं ठेवल्यास चिकटून बसतो. व सर्व ओलावा आकर्षक करूंन घेतो. त्याच्या अंगीं विष उतरण्याचा धर्म आहे अशी समजत होण्याचें कारण हेंच असावें.