विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बृहदारण्यकोपनिषद- हें उपनिषद सर्व उपनिषदांमध्यें अतिशय मोठें व महत्त्वाचें आहे, त्याचप्रमाणें सर्व उपनिषदांमध्यें हें अत्यंत जुनें उपनिषद् आहे असेंहि डॉयसनप्रभृति विद्वानांचें म्हणणें आहे. हें उपनिषद् शुक्लयजुर्वेदशाखेचें आहे. माध्यंदिन शाखेच्या शतपथ ब्राह्मणाच्या १४ व्या कांडाच्या शेवटच्या ५ प्रपाठकांमध्यें हें उपनिषद् आलेलें असून त्याचप्रमाणें याच ब्राह्मणाच्या काण्वशाखेच्या १७ व्या कांडांतहि हें आलेलें आहे. या उपनिषदाचा कर्ता अगर रचयिता हा वाजसनेयी याज्ञवल्क्य असावा असें म्हणतां येतें. बृहदारण्यकाचे एकंदर तीन भाग असून या प्रत्येक भागाचे दोन अध्याय आहेत. अंतर्रचनेवरून पहातां पहिले दोन भाग पूर्वीं स्वतंत्र असून नंतर एकत्र केलें गेलें असावेत असें मॅकडोनल्डचें मत आहे. तिसरा भाग हा 'खिलकांड' उर्फ पुरवणीवजा आहे. पहिल्या भागाला 'मधुकांड' अशी संज्ञा आहे यांतील पहिल्या अध्यायाच्या सुरवातीस अश्वमेधयज्ञ हा विश्वाचें रूपक आहे असें कल्पून नंतर त्यांतील प्रत्येक अंगाचा सांकेतिक अर्थ सांगितला आहे. पुढें प्राण हें आत्म्याचें द्योतक चिन्ह आहे असें प्रतिपादन केलें आहे. त्यानंतर ''आत्मा वा यमग्रऽआसीत'', ब्रह्म वा इदमग्र आसीत्तदात्मानमेवावेत्। अहं ब्रह्मास्मि'' अशा रीतीनें ब्रह्म अगर आत्मा हें मूलभूत असून त्यापासून या ब्रह्मांडाची उत्पत्ति झालीं आहे असें सांगितलें आहे. द्वितीय अध्यायांत आत्म्याचें स्वरूप तसेंच त्याचीं व्यक्तरूपें-पुरूष आणि प्राण-यांचा तात्त्विक विचार केला आहे. दुस-या अध्यायांत गार्ग्याजातशत्रु संवाद, कार्यकरणात्मक भूतस्वरूपनिर्धाणा, मूर्तामूर्तब्रह्मकथन व याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद इत्यादि कथाभाग आहे. दुस-या कांडाच्या म्हणजे याज्ञवल्क्य कांडाच्या पहिल्या अध्यायांत याज्ञवल्क्याचे अश्वल, आर्तभाग, भुज्यु, उषस्त, कहोळ, गार्गी, उद्दालक, शाकल्य, इत्यादिकांशीं संवाद आले असून त्यांत याज्ञवल्क्याची सरशी झालेंली दाखविली आहे. दुस-या अध्यायांत याज्ञवल्क्याचा व जनकाचा संवाद असून जनकाचे प्रश्न व त्यांवर याज्ञवल्क्याचीं उत्तरें आलीं आहेत. त्यांत जागृति, सुषुप्ति, स्वप्न, मृत्यु, संसार, मोक्ष, इत्यादि आत्म्याच्या विविध स्वरूपांचें स्पष्टीकरण केलेंलें आहे. तसेंच ज्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होतें त्याला देहान्तरप्राप्ति न होतां तो ब्रह्मस्वरूपीं विलीन होतो असें या अध्यायांत सांगितलें आहे. नंतर याज्ञवल्क्य संसाराचा त्याग करण्याची इच्छा करतो. त्यावेळीं त्याच्यामध्यें व त्याच्या बायकोमध्यें-मैत्रेयी मध्यें झालेंला संवाद आलेला आहे. खिलकांडाचीं पुष्कळ लहान लहान ब्राह्मणें असून दुस-या ब्राह्मणांत संसार वादाची चर्चा आली आहे.