विभाग आठरावा : बडोदें ते मूर  

बुसी- एक फ्रेंच सेनापति. बुसीचा जन्म फ्रान्समध्यें १७१८ सालीं होऊन, लाबूर्डोने गव्हर्नर असतां तो सेंटलुई येथें आला. १७४६ सालीं लाबूर्डोनेबरोबरच तो पांडिचेरीस आला, तेव्हांपासून तो इकडेच राहिला. यानंतर डुप्लेच्या हाताखालीं वागण्याचे त्यास अनेक प्रसंग येऊन, दोघांनीं स्वराष्ट्रहिताचीं अनेक कृत्यें केलीं. जिंजी किल्ला काबीज करण्यांत बुसीचें खरें शौर्य प्रगट झालें. बुसीनें निजामावर मोठ्या युक्तीनें वजन पाडून सर्व कारभार आपल्या हातांत घेतला पण त्याबद्दल लोकांस वैषम्य वाटूं नये म्हणून स्वतःची शेखी त्यानें मिरविली नाहीं, किंवा लोकांस आपलें फारसें वर्चस्व भासूं दिलें नाहीं (१७५१), परंतु फ्रेंचांचा  हेतु मराठ्यांनीं ओळखला होता व या सुमारास मराठ्यांनीं फ्रेंचांनां, गझीउद्दीनचा पक्ष घेऊन अडथळाहि फार केला होता.

त्यानंतर बुसीनें मराठ्यांशीं सलोखा ठेवला, व निजामालाहि तें धोरण स्वीकारण्यास लाविलें (१७५२). नंतर तो प्रकृतीसाठीं मच्छलीपट्टणास गेला. तेव्हां नबाबाच्या दिवाणानें फ्रेंच पलटणीस रजा दिली, त्याबरोबर बुसी परतला आणि त्यानें नवीन दिवाण नेमून पलटणीच्या खर्चाची अडचण पडूं नये म्हणून उत्तरसरकारप्रांत निजामाकडून आपल्याकडे घेतला. सावनूरच्या लढाईंत त्यानें पेशव्यांस चांगलीं मदत केली (१७५५).  मराठे व फ्रेंच (नानासाहेब व बुसी) यांनीं गुप्तपणें संगनमत करूंन निजामाचें राज्य हळू हळू खालसा करण्याचा बेत केला होता. परंतु निजामी दरबारांतील फ्रेंचविरोधी पक्षानें सावनूरच्या स्वारीनंतर निजामाला सांगून बुसीला रजा देवविली. परंतु बुसीनें मच्छलीपट्टण व सुरत येथून फ्रेंचांची फौज बोलावून तिच्या जोरावर पुन्हां आपलें वर्चस्व निजामावर बसविलें (१७५६). या नंतर बुसीनें इंग्रजांच्या पूर्वेकडील कांहीं बखारी काबीज केल्या. इतक्यांत हैद्राबादेस पुन्हां त्याच्याविरूद्ध कारस्थान सुरू झाल्यानें त्यानें फौजेसह हैदराबाद गांठलें व तें कारस्थान विस्कळित केलें. इतक्यांत लालीचें निकडीचें बोलावणें आल्यावरून तो दक्षिणेकडे  गेला (१७५८). परंतु त्या दोघांत चुरस लागून इंग्रज-फ्रेंच युद्धांत फ्रेंचांचा पराभव झाला (१७६०). वांदिवाशच्या लढाईंत बुसी इंग्रजांच्या हातीं लागला. त्यास त्यांनीं पुढें सोडून दिल्यावर तो देशीं परत गेला. त्यानें मुबलक पैसा मिळविला होता त्यावर त्यानें पुष्कळ दिवस चैन केली. नंतर तो पुन्हां हिंदुस्थानांत आला (१७८१). या वेळीं तो फ्रेंच सैन्याचा सेनापति होता परंतु या खेपेस त्याच्या हातून विशेष पराक्रम झालें नाहींत, व तो इकडेच मेला. (ब्रिटिश रियासत (पूर्वार्ध).)