विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुल्हर, जे. जी. (१८३७-१८९८)- एक जर्मन संस्कृत पंडित. गॉटिंजेन येथील विश्वविद्यालयांत अभ्यास करूंन बुल्हरनें 'डॉक्टर' ही पदवी संपादन केली व नंतर पॅरिस ऑक्सफर्ड व लंडन या ठिकाणच्या ग्रंथसंग्रहलयांतील संस्कृत शाखेंत त्यानें वेदग्रंथांच्या हस्तलिखितांच्या नकला व शुद्ध संस्करणें तयार करण्याचें काम केलें. लंडनमध्यें प्रो. मॅक्समुल्लर बुल्हर यांचा परिचय झाला. संस्कृत भाषेचें खरें मर्म जाणण्याकरितां हिंदुस्थानांत जाण्याचा त्यानें निश्चय केला. व मॅक्समुल्लरचा मित्र सर अलेक्झांडर ग्रांट यानें यास मुंबई येथील एलफिस्टन् कॉलेजांत प्राच्य भाषांचा अध्यापक नेमलें. स. १८६३ ते १८८० पर्यंत बुल्हरनें मुंबई सरकारच्या शिक्षणखात्यांत प्रोफेसर, एज्युकेशनल इनस्पेक्टर व प्राचीन लेखसंशोधनाचा मुख्य अधिकारी या नात्यानें काम केलें. १८८० सालीं बुल्हरनें पेन्शन घेऊन परत आल्यावर व्हिएन्ना येथील विश्वविद्यालयांतील संस्कृत व भारतविज्ञान या विषयांच्या अध्यापकाची जागा पत्करली. व्हिएन्ना हें नगर प्राच्यविद्येचें केंद्रस्थान व्हावें अशी बुल्हरची अत्युत्कृष्ट इच्छा असल्यामुळें १८८६ सालीं तेथील विश्वविद्यालयांत एक प्राच्यविद्यामंदिर त्यानें स्थापन केलें व याच्याच जोडीला ''व्हिएन्ना ओरिएंटल जर्नल'' नांवाचें नियतकालिक सुरू केलें.
हिंदुस्थानांतील 'आशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल,' 'अंजुमान-इ-पंजाब' इत्यादि अनेक संस्थांनीं त्याला आपला सभासद केलें, व हिंदुस्थान सरकारनेंहि सी. आय्. ई. हा किताब व एडिंबरो विश्वविद्यालयानें डॉक्टर ही पदवी समर्पण केली. बुल्हरचे अगदीं पहिले लेख तुलनात्मक भाषाशास्त्र व वैदिक दैवतेतिस ह्या विषयावर असून ते त्याचा गुरू प्रो. बेन्फे याच्या ''ओरिएंट व ऑक्सिडेंट'' नामक नियतकालिकांत प्रसिद्ध होत असत. तसेंच लंडन शहरीं असतांना त्यानें प्रो. मॅक्समुल्लरच्या ''संस्कृत वाङ्मयाचा इतिहास'' या ग्रंथास एक विषयसूचि तयार केली. डॉ. बुल्हरनें प्रो. किलहार्नच्या मदतीनें ''बाँबे संस्कृत सोरीज्'' या ग्रंथमालेची स्थापना केली. या मालेंतील कित्येक पुस्तकांच्या संपादनाची जबाबदारी स्वतंत्रपणें डॉ. बुल्हर याजवरच होती. या मालेंतील पंचतंत्र, दशकुमारचरित, विक्रमांकदेवचरित इत्यादि ग्रंथांचें संशोधन त्यानें स्वतःच केलें आहे.
हिंदुस्थानांत येतांच १८६७ सालीं सर रेमंड वेस्ट याच्या सहकारित्वानें बुल्हरनें सुप्रसिद्ध ''डायजेस्ट ऑफ हिंदु लॉ'' हा कायदेग्रंथ तयार केला. त्यानें आपस्तंब धर्मसूत्राचें प्रकाशन केलें व मॅक्समुल्लरच्या ''सेक्रेड् बुक्स् ऑफ दि ईस्ट'' ह्या ग्रंथमालेकरितां दुस-या व १४ व्या खंडांतील भाषांतरें केलीं. केंब्रिज येथील एका व्याख्यानांत प्रो. मॅक्समुल्लर यानें धिटाइनें अशी कल्पना मांडली कीं, वैदिक व बौद्ध वाङ्मयाखेरीज इतर सर्व संस्कृत वाङ्मय इन्डोसिथियन लोकांच्या स्वारीनंतर तयार झालें व मध्यंतरी वाङ्मयविकासांत एक मोठा खंड पडलेला दिसून येतो. बुल्हरनें एकंदर गुप्तपूर्व शिलालेखांतील अनेक साधनांवरून काव्यवाङ्मयाच्या अखंड प्रवाहाचें सातत्य सिद्ध केलें व सरतेशेवटीं मॅक्समुल्लरला याची ही गोष्ट मान्य करावी लागली. पुढें त्याचें मन शिलालेखांच्या सूक्ष्म अभ्यासाकडे खेचलें गेलें व ह्या ऐतिहासिक शिलालेखांच्या सूक्ष्म अभ्यासाचा परिणाम म्हणजेच त्यानें ''इंडियन अँटिक्वरी'' या नियतकालिकांत लिहिलेले ८५ लेख होत. या शिलालेखांचा अभ्यास करण्यांत बुल्हर याची दृष्टी केवळ ऐतिहासिक नसून प्राचीन लिपिसंशोधनविषयक होती, व या संशोधनाचें फल म्हणजे ''हिंदुस्थानी ब्रह्मी लिपी'' व ''हिंदु प्राचीन लिपिविद्या'' या विषयांवरील बुल्हरचे सर्वसामान्य ग्रंथ होत.
पुराणवस्तुसंशोधनशास्त्र, प्राचीन लिपिशास्त्र, भाषाशास्त्र, वाङ्मय, इत्यादि हिंदुस्थानासंबंधींच्या संशोधनाच्या अनेक शाखांपैकीं दरएक शाखेंत बुल्हरनें परिश्रम केलें आहेत. इ. स. १८६८ मध्यें डॉ. बुल्हर यानें प्रो. याकोबी याच्या साहाय्यानें मुंबई सरकारच्या सल्ल्यावरून निरनिराळ्या जैन ग्रंथसंग्रहालयांची पाहणी केली व सुमारें ५०० वर संस्कृत व प्राकृत ग्रंथ जमविले. इ. स. १८८७ मध्यें डॉ. बुल्हरनेंहि जर्मन भाषेंत ''जैनांचा हिंदु संप्रदाय'' हा ग्रंथ प्रसिद्ध केला.
शास्त्रीय विषयांमध्यें बुल्हरनें घातलेली शेवटची अमूल्य भर म्हणजे ''इंडो-इराणी संशोधनाचा ज्ञानकोश'' याची रचना होय. या ग्रंथाचे ९ खंड तो जिवंत असतांनाच तयार झालें असून त्यांमध्यें त्याचा स्वतःचा '' हिंदुस्थानी प्राचीन लिपिविज्ञान'' या विषयावरील लेख आला.