विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुलंदशहर, जिल्हा.- संयुक्तप्रांतांत, मिरत विभागांतील जिल्हा. क्षेत्रफळ १८९९ चौरस मैल. याच्या मध्यभागीं उंचवट्याचें मैदान असून, त्याच्या बाजूला, दोन्ही नद्यांच्या कांठीं खादर नांवाच्या सखल पट्ट्या आहेत. गंगा व यमुना यांच्याशिवाय हिंदन, बुरिया, व पूर्वकाली या दुस-या नद्या ह्या जिल्ह्यांतून वहातात. ह्या जिल्ह्याची हवा मिरत जिल्ह्यासारखी आहे. वार्षिक पाऊस सरासरी २६ इंच पडतो.
इतिहासः- हल्लींचा बुलंदशहर जिल्हा पांडवांच्या हस्तिनापूरच्या राज्यांत मोडत असें व तें शहर गंगा नदीच्या पुरानें वाहून गेल्यावर, ह्या जिल्ह्याचा राज्यकारभार बहारचा सुभेदार पहात असें, अशी दंतकथा येथील लोकांत प्रचलित आहे.ह्या दंतकथेमध्यें सत्यांश कितीहि असो. तथापि एका शिलालेखावरून एवढें मात्र सिद्ध होतें कीं, पांचव्या शतकांत ह्या जिल्ह्यांत गौंड ब्राह्मणांची वस्ती असून येथें गुप्तघराणें राज्य करीत असें. परंतु मुसुलमानांच्या आगमनापूर्वींच्या इतिहासावर फारच थोडा प्रकाश पडलेला आहे. १०१८ सालीं गझनीचा महंमद बरण (अद्यापिहि बुलंदशहराला कधीं कधीं या नांवानें संबोधितात) येथें आला त्यावेळीं तेथें हरदत्त नांवाचा राजा राज्य करीत होता. त्यानें आपल्या १०००० अनुयायांसह मुसुलमानी धर्म स्वीकारून आपले प्राण व मालमत्ता याचें तात्पुरतें संरक्षण केलें; पण त्यानंतर दोआबकडे नव्या टोळ्या येऊन रांहू लागल्या; त्या अद्यापहि तेथें रहात आहेत. ११९३ सालीं कुतुबुद्दीननें बरणवर चाल केली, त्यावेळीं दोर राजा चंद्रसेन यानें कांहीं काळपर्यंत शौर्यानें टिकाव धरला; पण त्याच्या एका नातेवाइकानें त्याच्याशीं विश्वासघात केल्यामुळें अखेर मुसुलमानांनीं तें शहर काबीज केलें. त्या विश्वासघातकी मनुष्यानें मुसुलमानी धर्म स्वीकारला व त्याला बरणचें चौधरी पद मिळालें. अद्यापहि त्याच्या वंशजाकडे कांहीं जमिनी चालू आहेत. बुलंदशहरामध्यें राहणा-या टोळ्यांपैकीं पुष्कळ टोळ्या प्रथम १४ व्या शतकांत ह्या जिल्ह्यामध्यें आल्या. हृयाच वेळीं मोंगल लोकांच्याहि स्वा-या होऊं लागल्यामुळें, रोगांच्या साथी, लढाया व दुष्काळ यांच्या योगानें दोआबची स्थिति अत्यंत शोचनीय झालीं होती; पण मोंगलांचें राज्य कायम झाल्यावर देशांत पुष्कळ काळपर्यंत शांतता राहिली व राजयकारभारहि सुयंत्रित चालला. बुलंदशहर हें दिल्लीपासून जवळ असल्यामुळें बंड करणारास येथें फारशी सवड मिळत नसे. १७०७ सालीं बहादुरशहा गादीवर बसल्यापासून मोंगल बादशाहीच्या -हासाला सुरवात झाल्यावर, इतर सुपीक प्रदेशाप्रमाणें, बरणवर संकटें येऊं लागलीं. पण बरण हें त्यावेळीं कोइलच्या अंकित असल्यामुळें त्याचा अठराव्या शतकाचा इतिहास अलीगड जिल्ह्याच्या इतिहासापेक्षां निराळा नाहीं. मराठ्यांच्या अंमलांत सुद्धां बरण कोइलच्या ताब्यांत असें; व जेव्हां तें गांव आणि अलीगडचा किल्ला १८०३ सालीं इंग्रजांनीं घेतला त्यावेळीं बुलंदशहर आणि आसपासचा मुलुख यांचा नवीन बनविलेल्या जिल्ह्यांत समावेश झाला. स्कंदगुप्ताचा (इ. स. ४६५-६६) व दोर राजांची वंशावळ असलेला असें दोन ताम्रपट या जिल्ह्यांत सांपडले आहेत. असूर व बुलंद शहर येथें प्राचीन अवशेष आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) १०६६५१९; पैकीं शेंकडा ७९ हिंदु आहेत. उत्तरभागांत हिंदुस्थानी व दक्षिणभागांत व्रज भाषा चालते. गंगायमुना यांच्या कांठची खादरजमीन सोडली असतां इतर ठिकाणीं नापीक व उसर जमीन आहे. मुख्य पिकें गहूं हरभरा, मका, ज्वारी व बाजरी; कापूस व ऊंस यांची लागवड बरीच वाढत आहे, पण निहीची लागवंड पुष्कळ कमी झालेंली आहे. जहांगिराबाद येथें चीट, शिकंदराबाद येथें मलमल, खुर्जा येथें मातीची भांडीं; जेवार येथें केंसाळ (पाय पुसण्याच्या काथ्याच्या) चट्या व बुलंदशहर आणि शिकारपूर येथील लांकडी कातकाम नामी असतें. बुलंदशहर तालुक्यांत भरभराटींत असलेला एक कांचेचा कारखाना असून तेथें बांगड्या व बाटल्या होतात. पुष्कळ ठिकाणीं हातमागावर कापड विणलें जातें निर्गत माल:- धान्य व कापूस असून कापड, धातूचे जिन्नस आणि मीठ हे मुख्य आयात जिन्नस होत. जिल्ह्याच्या पश्चिम भागांत दक्षिणेकडून उत्तरेकडे ईस्ट इंडिया रेल्वे गेलेंली आहे. साक्षरतेच्या बाबतींत हा जिल्हा मागासलेला असून शेंकडा २.५ लोकांस लिहितां वांचतां येतें. या जिल्ह्यांत ९ दवाखाने व रूग्णालयें आहेत.
तहशील.- जिल्ह्याची मध्य तहशील. क्षेत्रफळ ४७७ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) ३३३२२०. गांवें ५ व खेडीं ३७८. पूर्वकाली नदी तहशिलींतून वहाते. गंगेच्या कालव्यानें या भागांतील शेतीला कांहीं पाणी मिळतें; पण बरेंचसें पाणी विहिरीपासून मिळतें.
गांव.- जिल्ह्याचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण. लोक संख्या सुमारें २० हजार. या शहराचें जुनें नांव 'बरण' असें होतें पण हें एका उंचवट्यावर असल्यामुळें यास ऊंचा नगर किंवा बुलंदशहर म्हणूं लागलें. हें अहारच्या 'तोमर' राजानें वसविलें, तें त्याच्या वंशजापासून दिल्लीच्या पठाण बादशहानें घेतलें. येथील राजाच्या शौर्याबदृदल एक ताम्रपट सांपडला असून कांहीं पोवाडेहि उपलब्ध आहेत. हें ब्रिटिशांच्या ताब्यांत गेल्यापासून सारखें भरभराटीस येत आहे. येथें चार हायस्कुलें आहेत. निळीचे कारखानेहि बरेच आहेत.