विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुलढाणा, जिल्हा.- व-हाडांतील एक जिल्हा. क्षेत्रफळ ३६६२ चौरस मैल. या जिल्ह्यांतील मोठी नदी पाइनगंगा होय; पूर्णा ही दुसरी नदी आहे. पण या दोन नद्यांचें जिल्ह्याला विशेष महत्व नाहीं. लोणार सरोवर मेहकर तालुक्यांत आहे. डोंगरांतून वाघ, अस्वलें, चित्ते, लांडगे वगैरे हिंस्त्र श्वापदें आढळतात. बालघाटांतील तालुक्यांतील हवा पाईन घाटांतल्यापेक्षां जरा थंड असतें. बालघाटांतील तालुक्यांतून पाऊस फार पडतो.
या जिल्ह्याचा इतिहास सुसंगत देतां येणार नाहीं. रोहणखेड येथें १४३७ व १५९० या दोन सालीं दोन लढाया झाल्या. पहिली अल्लाउद्दीनशहा बहामनी (२ रा) याचा सेनापति खलफ हसन बासरी आणि खनदेशचा सुलतान नासिरखान फारूकी यांमध्यें; १७२४ सालीं साकरखड्र्याला लढाई होऊन फत्तेखर्डा पडलें. येथें आसाफखानानें मुबारीझखानावर जय मिळवून दक्षिणची गादी स्थापिली. दुस-या इंग्रज-मराठे युद्धारंभीं दौलतराव शिंदे व रघोजी भोंसले यांचा तळ मलकापूरला होता. १८६७ सालीं बुलढाणा हा स्वतंत्र जिल्हा झाला. लोणार व मेहकर या ठिकाणीं दोन अत्युत्कृष्ट हेमाडपंती देवालयें आहेत. फत्तेखर्डा (१५८१) व रोहणखेड (१५८२) येथें जुन्या मशिदी आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ६९९४२९. यांत ९ गांवें व ११७४ खेडीं आहेत. मलकापूर, नांदूर व देऊळगांवराजा हीं मोठीं गांवें होत. जिल्ह्याची भाषा मराठी आहे. हा जिल्हा शेतकीप्रधान आहे. शें. ७४ लोक शेतकी करतात. ज्वारी हें मुख्य पीक होय. लोणार सरोवरापासून पूर्वीं मीठ काढीत असत. पण आतां हा धंदा फायदेशीर नाहीं. धंद्याप्रमाणें कलाकौशल्याच्या दृष्टीनेंहि हा जिल्हा पुढारलेला नाहीं. मुख्य निर्गत माल कापूस, खाद्यधान्यें व गळिताचीं धान्यें व आयात माल साखर, कोळसा व मीठ होय. शें. ४ लोक साक्षर आहेत.
गांव- हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण जी. आय. पी. रेल्वेच्या मलकापूर स्टेशनच्या दक्षिणेस २८ मैलांवर आहे. लोकसंख्या ४०००. या गांवची हवा चांगलीं असून चिखल्दाच्या खालोखल सर्व व-हाडांत याची हवा थंड आहे. बुलढाणा हा शब्द भिल-ठाणा या शब्दाचा अपभ्रंश असावा. या गांवाचा पुर्वींचा इतिहास फारसा उपलब्ध नाहीं.