विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुध- सूर्यमालेंतील एक अंतर्ग्रह. सूर्य मालेमध्यें सूर्याला फार जवळ असणारा असा हा ग्रह आहे. त्याच्या पलीकडे शुक्रादि ग्रह आहेत. बुधाचें सूर्यापासून मध्यम अंतर, ४०३८९००० मैल आहे. असें गॅलब्रेथच्या ज्योतिषशास्त्र ग्रंथांत सिद्ध करूंन दाखविलें आहे. तेथें बुधाचें क्षितिजस्थलंबन (हारिझांटल पॅरलक्स) १४१९ विकला इतकें घेऊन बुधाचें अंतर काढून दाखविलें आहे. बुध सूर्याभोंवतीं ८७ दिवस, २३ तास १५ मिनिटें आणि ४६ सेकंद इतक्या कालांत एक प्रदक्षिणा करतो. बुधाची गति आंदोलनासारखी दिसतें. कारण तो सूर्यापासून सुमारें २२ अंश पुढें जातो व २२ अंश मागें येतो. यास इनापगम (इलाँगेशन) असें म्हणतात. या अंतरापेक्षां जास्त अंतर सूर्य व बुध यांमध्यें कधींहि होऊं शकत नाहीं. यामुळें बुध रात्री डोक्यावर कधींहि दिसावयाचा नाहीं. तो कधी सायंकाळीं पश्चिम क्षितिजावर, तर कधीं पहांटे पूर्व क्षितिजावर दिसतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्यें जेव्हां बुध येतो तेव्हां बुध सूर्याचा अंतर्योग किंवा अंतर्युति झालीं असें म्हणतात. जेव्हां बुध आणि पृथ्वी यांच्यामध्यें सूर्य येतो तेव्हां बुधसूर्याचा बहिर्योग किंवा बहिर्युति झालीं असें म्हणतात.
बुधसूर्यांचा बहिर्योग झाला असतां बुध आपणांपासून फार लांब असतो आणि अंतर्योग झाला असतां बुध आपणांस फारच जवळ असतो. बुध जवळ असतां त्याचें बिंब मोठें दिसलें असतें परंतू सूर्यतेजामुळें तो मुळींच दिसत ताहीं. बुध बिंबाचा व्यास ३१४० मैल आहे. बुधामध्यें घनत्व (डेन्सिटी) पृथ्वीच्या घनत्वाच्या १.१२ पट आहे. सूर्याचें वजन १०० कोटी खंडी मानलें तर बुधाचें फक्त २०० खंडी वजन भरेल. नुसत्या डोळ्यांनीं बुधाकडे पाहिलें असतां तो चांगला स्वच्छ, चकचकीत किंचित पिंवळसर दिसतों. मोठ्या दुर्बिणीनें बुध पाहिला असतां चंद्राप्रमाणें त्याच्या कला दिसतात. तो सूर्यप्रकाशानें प्रकाशित होतो.
(२) एक पौराणिक व्यक्ति. हा चंद्राचा पुत्र असून बृहस्पतिपत्नी तारा हिच्या उदरी जन्मला होता. यानें इलेशीं विवाह केला व या दांपत्याला पुरूरवस् हा सुपसिद्ध पुत्र झाला.